मुंबई : करोना काळात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील कमी झालेली प्रवासी संख्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. आजघडीला ‘मेट्रो १’मधून प्रतिदिन तीन लाख १५ हजार प्रवासी प्रवास करू लागले असून करोनाकाळात दूरावलेले प्रवासी पुन्हा ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील, असा विश्वास मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

करोना संसर्गामुळे देशभरात मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू झाली आणि मुंबईतील ‘मेट्रो १’ मार्गही बंद झाला. तब्बल २११ दिवस ‘मेट्रो १’ बंद होती. राज्य सरकारच्या आदेशानंतर १९ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘मेट्रो १’ पुन्हा सेवेत दाखल झाली. नवे नियम, अंतर्गत बदलांसह सेवेत दाखल झालेल्या या ‘मेट्रो १’ला सुरुवातीला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. करोनापूर्वकाळात प्रतिदिन चार लाख ५५ हजार प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करीत होते. मात्र १९ ऑक्टोबर २०२१ रोजी केवळ १२ हजार ७३८ प्रवाशांनी ‘मेट्रो १’मधून प्रवास केला. त्यानंतर काही काळ प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दिवाळीनंतर परिस्थिती सुधारत गेली. खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. त्याचबरोबर महाविद्यालये आणि शाळाही सुरू झाल्या. त्यामुळे ‘मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली.

टप्प्याटप्प्याने प्रवासी संख्या वाढत असून आजघडीला ‘मेट्रो १’मध्ये दररोज तीन लाख १५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. लवकरच पूर्वीप्रमाणे प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील, असा विश्वास एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Story img Loader