मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केला आहे. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी जनआंदोलन उभारून प्रसंगी न्यायालयीन लढाईची तयारीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न वादात अडकला आहे. ही कारशेड राई, मुर्धा, मोर्वा गावात प्रस्तावित होती. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने सरकारने कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील डोंगराळ जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील कार्यवाही करून जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

कारशेडच्या कामास सुरुवात करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने झाडे कापण्यासाठीचे प्रस्ताव मिरा-भाईंदर महानगर पालिककडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात २५०० झाडे कापण्यास परवानगी देण्यात आली असताना दुसऱ्या टप्प्यात ९९०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावावर स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी जोरदार आक्षेप घेत मोठ्या संख्येने आपल्या सूचना-हरकती नोंदविल्या आहेत. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील ‘आरे कारशेड’प्रमाणे उत्तनमधील कारशेडलाही वाढता विरोध होत आहे. ही कारशेडच अन्यत्र हलविण्याची मागणी स्थानिक पर्यावरणप्रेमी डॅनी जॉनी घोन्साल्वीस यांनी केली आहे. कारशेडसाठी ३७१६ झाडे कापली जाणार असून उर्वरित ७५९० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. मात्र आतापर्यंत करण्यात आलेल्या पुनर्रोपणातील १० टक्केही झाडे जगलेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डोंगरीत झाडांची कत्तल होणार असून पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचे यानिमित्ताने वनशक्ती संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.

प्रस्तावित कारशेडची जागा डोंगराळ भागात आहे. तेथे बिबटे, कोल्हे, घोरपडी, विविध प्रकारचे साप, मुंगूस, रानडुक्करे आदी संरक्षित वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अनेक प्रकारचे पक्षी आहेत.

मिरा-भाईंदर शहरात सिमेंटचे जंगल उभे राहत असताना डोंगरीतील हे जंगल ऑक्सिजनचा एकमेव नैसर्गिक स्राोत आहे.

हे जंगल नष्ट झाले तर पर्यावरणाची मोठी हानी होणार असून वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आमच्या गावाच्या एका बाजूला डम्पिंग ग्राऊंड असून त्याच्या दुर्गंधीने आम्ही आधीच हैराण आहोत. किमान दुसऱ्या बाजूला असलेल्या जंगलातून आम्हाला प्राणवायू तरी मिळतो. हे जंगल नष्ट झाले तर आम्ही काय करणार? – फादर ऑस्कर मेन्डोसना, स्थानिक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro project controversy after aarey mumbai news amy