मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्या १५ कोटी पार गेली आहे. सद्यस्थितीत या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून प्रतिदिन दोन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका सध्या कार्यान्वित आहेत.
या दोन्ही मार्गिकांवरील ‘दहिसर – डहाणुकरवाडी – आरे’ दरम्यानचा २० किमी लांबीचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर जानेवारी २०२३ मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका कार्यान्वित झाल्या. एकूण दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमेतने धावू लागल्या आहेत. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांना सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच सुरुवातीला या मार्गिकांवरून प्रतिदिन काही हजारांच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत होते. मात्र हळूहळू मुंबईकर या मार्गिकांकडे वळू लागले आणि आज या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ६० हजार झाली आहे.
आता या दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी संख्येने १५ कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली. या मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने फेब्रुवारी २०२४ मध्ये आठ लाखांचा टप्पा पार केला. तर मे २०२४ मध्ये एकूण प्रवासी संख्या १० कोटींवर गेली. एमएमएमओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येने नुकताच १५ कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या मार्गिकांवरून १५ कोटी ८४ लाख ८१ हजार ५८९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
या मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून प्रवाशांचा मेट्रो प्रवास अधिकाधिक सुकर करण्यासाठी एमएमएमओसीएलकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवास सुकर करण्यासाठी एमएमएमओसीएलकडून एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत (नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड) मुंबई १ कार्ड सेवा सुरू केली आहे. या सेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला दोन लाख ६९ हजार ६०२ प्रवासी मुंबई १ कार्डचा वापर करीत आहेत.