प्रचंड उकाडा, तुडुंब गर्दी आणि जीवघेणी धावपळ यामुळे नक्कोशा वाटणाऱ्या लोकलचाच प्रवास पाचवीला पुजलेल्या मुंबईकरांच्या आयुष्यात मेट्रोचा रेल्वेचा प्रवास हा नवीन अध्याय ठरणार आहे. मेट्रोचा प्रवास म्हणजे केवळ वातानुकूलित डब्यांमधील प्रवास नसून उंचावरून शहराचे दर्शन घेत जणू काही विमानातूनच ‘हवाई सफर’ असल्याचा अनुभव येतो. मुंबईतील रेल्वेच्या प्रवासाची ही मेट्रो प्रवाशांना दुसऱ्या दुनियेत नेते..
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर ही मेट्रो रेल्वे रविवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने (एमएमओपीएल) कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आप्त, नातेवाईक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना शनिवारी या मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव दिला. एरवी लोकलचे कळकट डबे, लोकलमध्ये शिरण्यासाठी करावी लागणारी रेटारेटी, फलाटांवर फिरणारे भिकारी, विक्रेते या नेहमीच्या दृश्यापेक्षा मेट्रो म्हणजे एकदम प्रवासाची दुसरी दुनियाच वाटते. मेट्रोच्या वातानुकूलित डब्यात शिरताच शरीराबरोबच मनही सुखावते. नव्या कोऱ्या डब्यांची लकाकी आणि त्यातील स्वच्छता हा मोठा दिलासा ठरतो आणि डब्यातील रचनेवर नजर खिळून राहते.
डी. एन. नगर स्थानकावरून गाडी सुटल्यावर कसलाही खडखडाट न करता विमानाने अलगदपणे वेग घ्यावा तसा मेट्रो रेल्वेने लगेच वेग घेतला आणि उंचावरून जाणाऱ्या मेट्रोच्या बरोबरीने मन हवेत तरंगू लागते. तिकडे लोकलमध्ये हजारो प्रवासी आपल्याला गाडीत कोंबून घेत नेहमीच्या यांत्रिकपणे जात आहेत आणि आपण या साऱ्यापासून अलिप्त होऊन नेत्रसुखद दृश्य पाहत जात आहोत ही जाणीव मनाला सुखावून जात होती.
प्रवासात उंचावरून जाताना शहरातील परिचित भाग वेगळ्या ‘अँगल’ने नजरेला पडतो. मेट्रो मार्गाइतक्या उंचीच्या इमारतींमधून उत्सुक नजरा धावत्या मेट्रोवर रोखल्या जात होत्या. गेली अनेक वर्षे नुसतीच चर्चा होत असलेली ही गाडी आता एकदाची मुंबईच्या सेवेत दाखल होत आहे, याचे त्यांनाही समाधान मिळत होते. उंचावरून जाणाऱ्या मेट्रोमधून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक पाहणे ही वेगळीच मौज.
उकाडा, गर्दी आणि गोंधळ या लोकलमधील नित्य परिचित त्रयींपासून सुटका देणारा असा हा मेट्रोचा प्रवास आहे. मात्र प्रवास संपवून स्थानकाबाहेर आल्यानंतर अंगाला झोंबणारे ऊन आणि त्रासदायक उकाडा झोंबला की प्रवाशाचे पाय पुन्हा जमिनीवर येतात.. आणि वाटते मुंबईत आणखी मेट्रो असायला हव्यात..
१ मेट्रोचे डबे हे आतून एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे या गाडीची भव्यता वाढली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून निवडलेली रेखाचित्रे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर लावण्यात आली आहेत. या चित्रांमुळे स्थानकांचा चेहरा खुलला आहे.
२ मेट्रोची प्रशस्त स्थानके नजर खिळवून टाकणारी आहेत. लोकलची स्थानके कितीही नाही म्हटले तरी असुरक्षित वाटतात. मेट्रोच्या स्थानकांवरील आणि डब्यातील सीसीटीव्ही मात्र आपण संभाव्य धोक्यांपासून मुक्त असल्याची आश्वासक जाणीव करून देतात.
३ ‘एक्सप्लोजिव्ह डिटेक्टर’, वॉकीटॉकी घेऊन फिरणारे सुरक्षा कर्मचारी आणि अधूनमधून गस्त घालणारे प्रशिक्षित कुत्रे असे ‘सुरक्षित’ चित्र मेट्रोच्या स्थानकांवर दिसते.
आजपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो दाखल
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीच्या उन्नतमार्गावर धावणारी वातानुकूलित मेट्रो रेल्वे अखेर रविवारी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. सकाळी साडे दहा वाजता मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होत असून दुपारी एक वाजल्यापासून मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करता येईल. बराच काळ प्रकल्प रखडल्याने वादात सापडलेली मेट्रो रेल्वे सुरू होत असतानाही आता तिकिटाच्या दरावरून वाद सुरू झाला असून काँग्रेस आघाडी सरकार आणि भाजपमध्ये त्यावरून राजकारण रंगले आहे.
मुंबई मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी साडे दहा वाजता उद्घाटन होईल आणि दुपारी एक वाजल्यापासून ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे, अशी घोषणा ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय मिश्रा यांनी शनिवारी केली. मेट्रोच्या रोज २७० ते २८० फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळी चार मिनिटांनी तर इतरवेळी आठ मिनिटांनी मेट्रोची एक फेरी होईल. चार डब्यांच्या १६ गाडय़ा धावतील. येत्या काही वर्षांत सहा डब्यांच्या गाडय़ा चालवण्याची योजना असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. पहिल्या महिनाभरासाठी वसरेवा ते घाटकोपपर्यंत कोठेही जाण्यासाठी दहा रुपयांचा विशेष सवलतीचा दरही मिश्रा यांनी जाहीर केला.
सोमय्यांचे नाटय़
मेट्रो रविवारी सुरू होण्याची घोषणा होत असताना ती तातडीने सुरू करावी या मागणीसाठी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता घाटकोपर येथील मेट्रो स्थानकाबाहेर आंदोलन केले. स्थानकाचे दरवाजे बंद असल्याने त्यांना आत जाता आले नाही.
अशी मेट्रो रेल्वे..
* वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग
* पाऊण ते दीड एक तासांचा प्रवास अवघ्या २१ मिनिटांत होणार
* चार डब्यांच्या गाडीची प्रवासी क्षमता ११७८ तर सहा डब्यांच्या गाडीची प्रवासी क्षमता १७९२. पहाटे साडेपाच ते रात्री १२ पर्यंत धावणार मेट्रो रेल्वे
* दर चार मिनिटांनी एक गाडी. सध्या १६ गाडय़ा मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल
* रोज सहा लाख प्रवाशांच्या वाहतुकीची क्षमता
‘सीसीटीव्ही’ची आणि दक्षता पथकाची नजर
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर मेट्रो रेल्वे सुरक्षित असावी यासाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानकांबरोबरच धावत्या गाडीतील प्रत्येक डब्यातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. असे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रो रेल्वेत असणार आहेत. याच सुरक्षा यंत्रणेचा भाग म्हणून मेट्रोच्या सर्व १२ स्थानकांवर एक श्वानपथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्फोटके, हत्यारे घेऊन कोणीही प्रवास करू शकणार नाही शिवाय स्थानकावर ती ठेवून पसार होण्याचा धोकाही टळेल. प्रवाशांच्या झटपट तपासणीसाठी ‘हँड हेल्ड एक्स्प्लोजिव्ह डिटेक्टर’ही असणार आहेत. त्याचबरोबर मेट्रोच्या स्थानकांवरील हालचाली, संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे ‘मुंबई सुरक्षा पथक’ आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहून हे दक्षता पथक कार्यरत राहील. दक्षता पथकात दोन कर्मचारी असतील. त्यापैकी एक पुरुष असेल व दुसरी महिला. हे दोघे स्थानक व आसपासच्या परिसरात नजर ठेवतील. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्या व्यक्तींची माहिती सुरक्षा यंत्रणेला देतील आणि परिस्थितीनुसार त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या हवाली करतील.
स्थानकांवरील सुविधा
मुंबईकरांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी उपहारगृहांपासून ते बँक व्यवहारांसाठी एटीएम यंत्रणेपर्यंतच्या सर्व सुविधा मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक मेट्रो स्थानकावर त्यासाठी सुमारे १०० चौरस मीटरची जागा त्यासाठी ठेवण्यात आली आहे.
संपर्कासाठीच्या सुविधा
स्कायटेक : मोबाइलधारकांच्या विविध गरजा या कंपनीच्या दालनाच्या माध्यमातून भागवल्या जातील.
पोटपुजेसाठी..
स्ट्रीट फूड्स ऑफ इंडिया, बेकर्स स्ट्रीट, हॅवमोर आइस्क्रीम
एटीएम : कोटक महिंद्र बँक
मेट्रो रेल्वेचे हुकलेले मुहूर्त
१. जुलै २०१०
२. सप्टेंबर २०१०
३. जुलै २०११
४. मार्च २०१२
५. नोव्हेंबर २०१२
६. मे २०१३
७. सप्टेंबर २०१३
८. डिसेंबर २०१३
९. मार्च २०१४
१०. मे २०१४
डबेवाल्यांनाही हवा मेट्रोमध्ये प्रवेश..
मुंबईच्या विकासात सर्वसामान्य डबेवाल्यांचेही योगदान मोठे असून त्यांना पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेप्रमाणे मेट्रोमध्येही प्रवेश मिळावा, अशी मागणी डबेवाल्यांच्या संघटनेने केली आहे. या संदर्भात मुंबईच्या डबेवाल्यांनी मुख्यमंत्री, एमएमआरडीए यांच्याकडे मागणी केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेत डबेवाल्यांना त्यांच्या डब्यांसह प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी डबेवाल्यांची मागणी आहे. परंतु, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी केली आहे.