मुंबई : मेट्रो स्थानकातून उतरल्यानंतर थेट आपल्या इमारतीत, खरेदीसाठी माॅलमध्ये वा शाळा – महाविद्यालयात, कार्यालयात पोहचणे आता शक्य होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मल्टीमाॅडल इंटीग्रेशनअंतर्गत खासगी-सार्वजनिक सहभागातून मेट्रो स्थानकांच्या आसपासची महत्त्वाचे ठिकाणी थेट मेट्रो स्थानकांशी पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर असा पहिला पादचारी पूल नुकताच सेवेत दाखल झाला आहे. ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील बोरिवलीमधील देवीपाडा मेट्रो स्थानक ते ऑबेराॅय स्काय सिटी माॅल दरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला असून हा माॅल आणि पूल नागरिकांनासाठी खुला झाला आहे. दरम्यान, मेट्रो स्थानकांना थेट आसपासच्या मोठ्या मालमत्तांशी जोडण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.

एमएमआरडीएने मेट्रो स्थानके नजीकच्या मोठ्या मालमत्तांशी अर्थात निवासी संकुले, माॅल, कार्यालये वा इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेशी थेट पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय मल्टीमाॅडल इंटीग्रेशन उपक्रमाअंतर्गत घेतला. त्यानुसार ज्या निवासी वा व्यावसायिक संकुलांना थेट मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्याची गरज भासेल त्यांनी एमएमआरडीएने प्रस्ताव पाठवावा असे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर दोन ते तीन पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील पहिला पादचारी पूल तयार होऊन सेवेत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्थानकातून थेट मॉलमध्ये

बोरिवलीमधील ऑबेराॅय स्काय सिटी माॅल थेट नजीकच्या ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील देवीपाडा मेट्रो स्थानकाशी जोडण्यासाठी ऑबेराॅय रियल्टीने एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देऊन ऑबेराॅय स्काय सिटी माॅल – देवीपाडा मेट्रो स्थानक दरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला आहे. नुकतेच माॅल आणि या पादचारी पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून पादचारी पूल सेवेत दाखल झाला आहे. या पादचारी पुलामुळे मेट्रो स्थानकातून थेट माॅलमध्ये पोहचता येत आहे.

उभारणी, खर्च, देखभालीची जबाबदारी मालमत्ताधारकांची

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीचा प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता देऊन पादचारी पुलाच्या बांधकामावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी एमएमआरडीएची असणार आहे. तर पादचारी पुलाची उभारणी, त्यासाठीचा खर्च आणि पुलाची देखभाल ही सर्व जबाबदारी संबंधित मालमत्ताधारकांची असणार आहे. देवीपाडा – ऑबेराॅय स्काय सिटी माॅल पादचारी पुलाच्या धर्तीवर आता एमएमआरडीएकडे अनेक निवासी, व्यावसायिक मालमत्ताधारकांचे प्रस्ताव येतील, अशी आशा व्यक्त होत आहे.