वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून वर्षभरापूर्वी वाद सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या करारात ठरलेला दरच घेण्याची तंबी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर इतके दिवस मूग गिळून गप्प बसणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला आता केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर मात्र कंठ फुटला असून दराबाबत मुख्यमंत्र्यांचा इशारा धाब्यावर बसवण्यापर्यंत ‘रिलायन्स’ची मजल गेल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.
मेट्रो प्रकल्प बांधण्याचा आणि तो ३५ वर्षे चालवण्याचे कंत्राट ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ या कंपनीस देताना किमान तिकीट दर नऊ रुपये असेल तर कमाल १३ रुपये असेल असे करारात ठरवण्यात आले होते. करारानुसार या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये होता. प्रकल्प बराच काळ रखडल्याने तो आता ४३२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. परिणामी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव ‘रिलायन्स’ने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारपुढे ठेवला होता. दहा रुपये ते ४० रुपये तिकीट दर असावेत अशी त्यांची मागणी होती.
मात्र, ऑगस्ट २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर प्रसंगी प्रकल्प ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. त्यावेळी ‘रिलायन्स’ने काहीही भाष्य केले नाही. उलट मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले होते. आता मेट्रो रेल्वे रविवारी सुरू असताना पुन्हा तिकीट दराचा वाद ‘रिलायन्स’ने उपस्थित केला आणि किमान १० रुपये ते कमाल ४० रुपये असा दर राहील असे सूतोवाच केले. आता केंद्रात काँग्रेसचे सरकार राहिलेले नाही. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारची राजकीय ताकद कमी झाली आहे. त्यातूनच ‘रिलायन्स’चे धाडस वाढले आणि राज्य सरकारतर्फे कोणीही नाही आले तरी उद्घाटन होणार आणि मेट्रो रेल्वे सुरू होणार असे सांगत केंद्रातील सत्तापालटानंतर आपल्याला कंठ फुटल्याचे ‘रिलायन्स’ने दाखवून दिले.
‘तिकीट दर ठरवण्याचा अधिकार आम्हालाच’
महिनाभर विशेष सवलतीच्या दराने भाडे आकारले जाणार असून त्यानंतर तिकीट दराच्या मुद्याचा आढावा घेऊन काय तो निर्णय घेऊ, असे ‘एमएमओपीएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय मिश्रा म्हणाले. मेट्रो रेल्वे ही मेट्रो कायद्यातील तरतुदीनुसार चालते आणि हा कायदा राज्य सरकारच्या विनंतीवरूनच तयार झाला आहे. मेट्रो चालवणाराच तिकीटचा दर निश्चित करेल असे त्यात नमूद केलेले असल्यामुळे तिकीट दर निश्चितीचा अधिकार आम्हालाच आहे, असे मिश्रा यांनी नमूद केले. देशातील इतर मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत मुंबईतील तिकीट दर सर्वात कमी आहे, असा दावा त्यांनी केला.
मेट्रोच्या कंत्राटाबाबतच्या करारात किमान ९ ते कमाल १३ रुपये असे दर नमूद असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, मेट्रो कायदा आणि हा करार यात कुठलीही विसंगती नाही. मेट्रोबाबतच्या कायद्यातील तरतूद ही करारातील तरतुदींपेक्षा महत्त्वाची राहील, असे त्यात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. तिकीट दरवाढीबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याकडे लक्ष वेधता, या संदर्भात ‘एमएमआरडीए’ने आम्हाला कुठलीही सूचना दिली नाही, असे मिश्रा म्हणाले. तर तिकीट दर निश्चितीसाठीची समिती ही राज्य सरकारने आपला प्रतिनिधी नेमला नसल्याने स्थापन झालेली नाही, असे अन्य एका अधिकाऱ्याने नमूद केले.
तिकीटदराचा वाद
* प्रकल्प सुरू करताना किमान ९ रुपये ते कमाल १३ रुपये असा दर मेट्रोच्या तिकिटासाठी निश्चित करण्यात आला होता.
* ‘बेस्ट’च्या तिकिटाच्या दीडपट दर मेट्रोच्या तिकिटाचा असेल या तत्त्वानुसार आताच्या ‘मेट्रो’साठी दहा रुपये ते ३८ रुपये इतका दर होतो.
* मेट्रोचे किमान तिकीट १० रुपये तर कमाल ४० रुपयांपर्यंत असावेत, अशी हा प्रकल्प बांधणाऱ्या आणि चालवण्याची जबाबदारी असलेल्या ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’चे म्हणणे आहे. त्यावरून राज्य सरकार आणि ‘मुंबई मेट्रो वन’मध्ये वाद सुरू आहे.
* मात्र तिकिटाच्या दराच्या वादाचा परिणाम मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्यावर होणार नाही, असे ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी पूर्वीच जाहीर केले होते.
* त्यानुसार आता पहिल्या महिनाभरासाठी १० रुपयांच्या सवलतीच्या दराने तिकीट आकारण्यात येणार आहे. त्यानंतर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ४० रुपये असे टप्प्यानुसार तिकीट दर असतील असे मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
mega block today
mega block today, mega block, loksatta news, loksatta, marathi news, marathi
आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वे
* कुठे – मुलुंड ते माटुंगा
अप जलद मार्गावर
* कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ४.००
* परिणाम – ठाण्याहून जाणाऱ्या गाडय़ा धीम्या मार्गावर वळविणार. मुलुंड ते शीव दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी १०.०८ ते दुपारी २.५१ दरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलंड येथे थांबणार. या गाडय़ांना १५ मिनिटे उशिर होणार.
हार्बर रेल्वे
* कुठे- कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर
* कधी- सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.
* परिणाम – छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत बंद. पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ या वेळेत बंद. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी- पनवेलसाठी विशेष गाडय़ा सोडणार. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ ट्रान्स हार्बर व मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा.
पश्चिम रेल्वे
* कुठे – सांताक्रूझ ते माहीम जलद मार्गावर
* कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५.
* परिणाम – जलद मार्गावरील गाडय़ा सांताक्रूझ ते माहीमदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाडय़ा रद्द होतील. वांद्रे आणि खार दरम्यानचे रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहील.