वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून वर्षभरापूर्वी वाद सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या करारात ठरलेला दरच घेण्याची तंबी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर इतके दिवस मूग गिळून गप्प बसणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला आता केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर मात्र कंठ फुटला असून दराबाबत मुख्यमंत्र्यांचा इशारा धाब्यावर बसवण्यापर्यंत ‘रिलायन्स’ची मजल गेल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.
मेट्रो प्रकल्प बांधण्याचा आणि तो ३५ वर्षे चालवण्याचे कंत्राट ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ या कंपनीस देताना किमान तिकीट दर नऊ रुपये असेल तर कमाल १३ रुपये असेल असे करारात ठरवण्यात आले होते. करारानुसार या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये होता. प्रकल्प बराच काळ रखडल्याने तो आता ४३२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. परिणामी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव ‘रिलायन्स’ने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारपुढे ठेवला होता. दहा रुपये ते ४० रुपये तिकीट दर असावेत अशी त्यांची मागणी होती.
मात्र, ऑगस्ट २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर प्रसंगी प्रकल्प ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. त्यावेळी ‘रिलायन्स’ने काहीही भाष्य केले नाही. उलट मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले होते. आता मेट्रो रेल्वे रविवारी सुरू असताना पुन्हा तिकीट दराचा वाद ‘रिलायन्स’ने उपस्थित केला आणि किमान १० रुपये ते कमाल ४० रुपये असा दर राहील असे सूतोवाच केले. आता केंद्रात काँग्रेसचे सरकार राहिलेले नाही. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारची राजकीय ताकद कमी झाली आहे. त्यातूनच ‘रिलायन्स’चे धाडस वाढले आणि राज्य सरकारतर्फे कोणीही नाही आले तरी उद्घाटन होणार आणि मेट्रो रेल्वे सुरू होणार असे सांगत केंद्रातील सत्तापालटानंतर आपल्याला कंठ फुटल्याचे ‘रिलायन्स’ने दाखवून दिले.
..आणि रिलायन्सला कंठ फुटला
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून वर्षभरापूर्वी वाद सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या करारात ठरलेला दरच घेण्याची तंबी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर इतके दिवस मूग गिळून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-06-2014 at 06:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro ticket rate ambani neglects cm chavan suggestions