वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचे काम वर्षांखेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असताना मेट्रो रेल्वेच्या १२ स्थानकांचे सरासरी ७६ टक्केच काम पूर्ण झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाकीचे काम पूर्ण होणार कधी आणि सुरक्षा चाचण्यांची मालिका संपून मेट्रो रेल्वे धावणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. २००६ मध्ये या मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. बराच काळ काम रेंगाळल्याने बांधकाम खर्चात वाढ झाली असून जादा गाडय़ांमुळेही खर्चात वाढ झाली आहे. आता मेट्रोचा खर्च सुमारे ३८०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. मोनोरेलची प्रवाशांसह चाचणी नुकतीच झाल्याने मेट्रो रेल्वेबाबत उत्सुकता आहे.
मात्र, मेट्रो रेल्वे मार्गाचे बांधकाम जवळपास ९२ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ आठ टक्के काम बाकी आहे. मेट्रो रेल्वेवर वसरेवा, डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, विमानतळ रस्ता, मरोळ नाका, साकीनाका, असल्फा रोड, जागृती नगर आणि घाटकोपर स्थानक अशी १२ स्थानके आहेत. पैकी वसरेवा, डीएन नगर, चकाला यासारख्या स्थानकांचे ९० ते ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर असल्फा, अंधेरीसारख्या काही स्थानकांचे बांधकाम ५० ते ६५ टक्केच होऊ शकले आहे. त्यामुळे बारा स्थानकांचे सरासरी ७६ टक्के काम झाल्याचे चित्र माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे.
मेट्रोचे काम पूर्ण होण्याबाबत आजवर जुलै २०१० पासून मे २०१३ पर्यंतचे तब्बल सहा मुहूर्त हुकले असल्याचेही अनिल गलगली यांच्या अर्जाला उत्तर देताना ‘एमएमआरडीए’ने कळवले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मार्गाच्या बांधकामची सुरक्षितता, लोहमार्ग, विद्युत यंत्रणेची सुरक्षितता या साऱ्या चाचण्या पार पाडाव्या लागतात. नंतर मेट्रो रेल्वे चालवण्याच्या चाचण्या घ्याव्या लागतील. मोनोरेलच्या अशाप्रकारच्या चाचण्या या जवळपास वर्षभर सुरू आहेत.
या पाश्र्वभूमीवर मेट्रोच्या स्थानकांचे बांधकाम अद्याप बाकी असल्याने ते काम संपणार कधी आणि मेट्रोच्या चाचण्या होणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्षांखेपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याचा मुहूर्त गाठला जाण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा