मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) ९६.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला वेग देऊन निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मुखर्जी यांनी नुकतीच प्रकल्पस्थळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरील आदेश दिले. परिणामी, शिवडी येथून नवी मुंबईला २० ते २२ मिनिटांत पोहोचण्याचे प्रवाशांचे स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे.
मुंबई – नवी मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए २१.८० किमी लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूची उभारणी करीत आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. हे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर अडचणींमुळे नियोजित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. पण आता मात्र डिसेंबर २०२३ पर्यंत हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार एमएमआरडीएने केला आहे. त्यासाठी दर महिन्याला प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुखर्जी यांनी या प्रकल्पास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. आतापर्यंत प्रकल्पाचे ९६.६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकल्पाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले असून प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>सांताक्रुझ येथे महिलेच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
सागरी सेतू प्रकल्पात सध्या विजेच्या दिव्यांच्या खांबाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात एकूण १२१२ विजेच्या दिव्यांच्या खांबांची उभारणी करण्यात येणार असून त्यापैकी २० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विजेचे दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे नियंत्रित केले जाणार आहेत. हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानावर मात करतील अशा पद्धतीने निर्माण करण्यात आले आहेत. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वाऱ्याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोय करण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.