मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या मदतीने मोठा दिलासा दिला आहे. बेस्टने नुकतीच गुंदवली मेट्रो स्थानक – वांद्रे-कुर्ला संकुल अशी प्रीमियम वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे अंधेरीवरून वांद्रे-कुर्ला संकुलात जाणे-येणे मेट्रो प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.
गुंदवली मेट्रो स्थानक – वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे-कुर्ला संकुल – गुंदवली मेट्रो स्थानक या मार्गावर ‘एस-११२’ क्रमांकाची वातानुकूलित बस सुरू करण्यात आली आहे. या मार्गात एकूण २१ थांबे आहेत. गुंदवली – वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर सकाळी ०७.३० वाजल्यापासून ११.४० वाजेपर्यंत १६, तर वांद्रे-कुर्ला संकुल – गुंदवली मार्गावर दुपारी ३.४० वाजल्यापासून रात्री ८.१५ वाजेपर्यंत १३ अशा एकूण २९ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. गुंदवली – वांद्रे-कुर्ला संकुल प्रवासादरम्यान सुमारे ६० रुपये ते ९० रुपये इतके भाडे आकारण्यात येत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या ‘चलो ॲप’वरून तिकीट घ्यावे लागेल.
हेही वाचा >>>मुंबईः निष्कासन कारवाईदरम्यान महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण
प्रवाशांचा मेट्रो प्रवासच नव्हे तर त्या पुढील इच्छित स्थळापर्यंत पोहोचणे सुकर व्हावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळेच मेट्रो स्थानकापासून महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत बेस्ट सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून आता गुंदवली – वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान वातानुकूलित बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त आणि एमएमएमओसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. बेस्ट बसबरोबरच मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ, इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देणे यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.