मुंबई : म्हाडाचे मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबवित आहे. निविदा सादर करण्याची मुदत २० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या निविदा पूर्व बैठकीत इच्छुक कंत्राटदार कंपन्यांनी निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. मुंबई मंडळ त्यांच्या मागणीचा विचार करीत असून याबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभ्युदय नगर वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. ३३ एकर जागेवरील ४९ इमारतींच्या पुनर्विकासाअंतर्गत ३३५० कुटुंबांना अंदाजे ६३५ चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे. मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सीची अर्थात खासगी विकासकाच्या नियुक्ती करून म्हाडाच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आणि सुमारे ८०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या पुनर्विकासासाठी मंडळाने विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर रोजी होती. मात्र आचारसंहिता, निवडणुकीची धामधूम लक्षात घेता निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनुसार निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर आहे. मात्र या निविदा प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…“… आणि मला पँटमध्येच लघवी करावी लागली”, ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टमध्ये सुविधांची वाणवा; प्रेक्षकानं सांगितला धक्कादायक अनुभव

या प्रकल्पासाठी नुकतीच निविदा पूर्व बैठक पार पडली. यात बैठकीला मोठ्या संख्येने इच्छुक कंपन्यांनी हजेरी लावली. मात्र यावेळी या कंपन्यांनी निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या मागणीचा विचार सुरू असून यासंबंधीचा निर्णय लवकरच वरिष्ठांकडून जाहीर केला जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षातच या प्रकल्पाचे कंत्राट अंतिम होण्याची चिन्हे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mhada board is likely to get extension for abhyudnagar redevelopment tender process mumbai print news sud 02