मुंबई : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील महत्त्वाचे पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २७ हजार झोपड्यांच्या पुनर्वसनासह अभ्युदयनगर पुनर्विकास आणि जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. यासह अन्य काही घरांच्या बांधकामालाही सुरुवात केली जाईल. येत्या दोन महिन्यांत मुंबईत ३५ हजारांंहून अधिक घरांच्या बांधकामाला सुरुवात होईल.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर सरकारी योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळावी यासाठी प्रत्येक खात्याला १०० दिवसांचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार म्हाडाने कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबईत ३३ हजारांहून अधिक घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २७ हजार झोपड्यांच्या पुनर्वसनासह काळाचौकीतील अभ्युदयनगर आणि जीटीबीनगर पुनर्विकास प्रकल्पाचा समावेश आहे. या तिन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
राष्ट्रीय उद्यानातील २७ हजार, अभ्युदयनगरमधील अंदाजे ३,३५० आणि जीटीबीनगरमधील अंदाजे १,२०० अशा एकूण ३१,५०० घरांची निर्मिती या तीन प्रकल्पांतून होईल. अभ्युदयनगर पुनर्विकासातून मुंबई मंडळाला ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिरिक्त सदनिका उपलब्ध होतील. जीटीबीनगर पुनर्विकासातून मंडळाला किमान २३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील सदनिका उपलब्ध होतील. त्यामुळे या प्रकल्पांतील गृहनिर्मितीची संख्या वाढेल. या प्रकल्पांसह अन्य छोट्या प्रकल्पांतील घरांच्या बांधकामालाही १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवात होईल. एकूणच नव्या वर्षात मुंबईमध्ये ३५ हजारांहून अधिक घरांच्या बांधकामाला मुंबई मंडळाकडून सुरुवात केली जाईल.
वसतिगृहाचेही भूमिपूजन
एमएमआर ‘ग्रोथ हब’अंतर्गत म्हाडाने एमएमआरमध्ये नोकरदार महिलांसाठी मोठ्या संख्येने वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबई मंडळाने २०२१ मध्येच ताडदेवमध्ये असे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. एमपी मिल कम्पाऊंड परिसरातील संक्रमण शिबिराच्या दोन हजार चौरस मीटर जागेवर २२ मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हे वसतिगृह प्रत्यक्षात मार्गी लागले नाही. पण आता मात्र वसतिगृहाच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या प्रकल्पाचेही भूमिपूजन येत्या काही दिवसांत १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.