मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाचे मुंबई मंडळ विशेष अभियान राबवित आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक लाख ११ हजार ६४८ कामगार – वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ९६ हजार ३१३ कामगार – वारस पात्र ठरले आहेत. तर ३९ हजार कामगार – वारसांच्या कागदपत्रांची मुंबई मंडळाला प्रतीक्षा आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. यातील १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती झालेली नाही. असे असताना आता सोडतीआधीच या अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार घेतला आहे. यासाठी म्हाडाने १४ सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामागरांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. तर कामगार विभाग पात्रता निश्चिती करीत आहे. या अभियानाला म्हाडाकडून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजही हे अभियान सुरू असून गेल्या आठ महिन्यांमध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा : कोकण रेल्वेची गणेशोत्सव प्रतीक्षा यादी ५०० पार, एका मिनिटात गाड्या संपूर्ण आरक्षित
सप्टेंबर ते ७ मे या कालावधीत एक लाख ५० हजार ४८४ पैकी एक लाख ११ हजार ६४७ कामगार – वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी १० हजार ३८१ कागदपत्रे ऑफलाईन जमा झाली आहेत. तर एक लाख एक हजार २२६ अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. कागपत्र जमा करणाऱ्या एकूण एक लाख ११ हजार ६४७ पैकी आतापर्यंत ९६ हजार ३१३ कामगार – वारस पात्र ठरले आहेत. तर ५५६४ कामगार – वारस अपात्र ठरल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ९९७० कामगार – वारसांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप ३९ हजार कामगार – वारसांनी अर्ज सादर केलेले नाहीत. कामगार-वारसांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.