मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या किंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातील घरांसाठी अडीच कोटींहून अधिकचे दर निश्चित करण्यात आले असून यामुळे म्हाडावर टीका होत आहे. तर दुरूस्ती मंडळाकडून मिळालेल्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या महागड्या घरांच्या विक्रीचा पेच म्हाडासमोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर आता घरांचे क्षेत्रफळ, उत्पन्न गट वा किंमती निश्चित करण्याच्या धोरणात बदल करता येतो का यादृष्टीने म्हाडाने चाचपणी सुरू केली आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुरूस्ती मंडळाला ३३ (५) अंतर्गत पुनर्विकासातून उपलब्ध होणारी मोठी घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी वर्ग केली जातात. दुरूस्ती मंडळाकडून उपलब्ध झालेल्या ८९ घरांचा सप्टेंबर २०२४ च्या सोडतीत समावेश आहे. तर मागील सोडतीतील काही घरेही विक्रीवाचून रिक्त राहिली होती. ही घरेही सप्टेंबरच्या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यात ताडदेवमधील साडेसात कोटींच्या सात घरांचाही समावेश आहे. ही घरे महागडी असल्याने विकली गेली नव्हती. दुरूस्ती मंडळाकडून मिळालेली १३ सप्टेंबरच्या सोडतीतील सर्व घरे महागडी आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदा अल्प गटातील घरांच्या किंमती दीड कोटी ते पावणेतीन कोटींच्या घरात आहेत. महिना ५० ते ७५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना ही घरे कशी परवडणार अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा…वरळी अपघात प्रकरण : मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक बेकायदा?

यंदा अर्जविक्री-स्वीकृतीला कमी प्रतिसाद मिळत असून त्यातही ३३(५) मधील घरांना कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता म्हाडा प्राधिकरणाने दुरूस्ती मंडळाकडून उपलब्ध होणाऱ्या सोडतीतील घरांच्या विक्रीसाठी धोरणात्मक बदल करता येईल का याची चाचपणी सुरू केल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. या घरांच्या किंमत निश्चितीच्या धोरणानुसार त्या त्या ठिकाणच्या रेडी रेकनरच्या ११० टक्के किंमत घरासाठी निश्चित केली जाते. ही घरे दक्षिण मुंबई ताडदेव, वरळी, दादर अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे घरांच्या किंमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अत्यल्प गटासाठी ३० चौ. मी, अल्प गटासाठी ६० चौ.मी., मध्यम गटासाठी ९० चौ. मी आणि उच्च गटासाठी ९० चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळाचे घर अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वरळी आदी भागातील ६० चौ. फुटाच्या आतील घरे अल्प उत्पन्न गटात समाविष्ट झाली आहेत. यामुळे अल्प गटातील घरे महागडी ठरत असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. विक्रीच्या धोरणात बदल करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. यासंबंधी योग्य तो निर्णय घेत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

म्हाडाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, रेडीरेकनरच्या ११० टक्क्यांऐवजी रेडीरेकनरच्या ७० टक्क्यांपर्यंत किंमती निश्चित करता येतील का यादृष्टीने विचार सुरू आहे. तर उत्पन्न गटानुसार घरांचे क्षेत्रफळ निश्चित न करता किंमतीनुसार उत्पन्न गट निश्चित करता येईल यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.

हेही वाचा…मुंबई : कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा, तुळई तयार असूनही पूल रखडणार

सप्टेंबर २०२४ च्या सोडतीतील घरांच्या किंमती जैसे थे

१३ सप्टेंबरच्या सोडतीतील दुरूस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरासह इतर घरांच्या किंमतीही आव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे या सोडतीतील घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी होत आहे. पण या सोडतीतील घरांच्या किंमतीत कोणताही बदल होणार नसल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. दुरूस्ती मंडळाच्या घरांच्या विक्री धोरणामध्ये जो काही बदल होईल त्याची अंमलबजावणी पुढील सोडतीत होईल असेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mhada faces criticism over staggering house prices in 2030 lot considers policy changes mumbai print news psg