मुंबई: मुंबईत म्हाडाचे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून २०३० घरांच्या सोडतीची जाहिरात ८ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहिर करण्याचे मुंबई मंडळाचा नियोजन आहे. त्याचवेळी यंदा या सोडतीत अत्यल्प गटाची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण या गटासाठी सर्वात कमी घरे उपलब्ध आहेत. मध्यम गटासाठी मात्र सर्वाधिक घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये ४०८२ घरांची सोडत काढली होती. या सोडतीत अत्यल्प गटासाठी अर्थात सर्वसामान्यांसाठी सर्वाधिक घरे होती. अंदाजे अडीच हजार घरे या गटासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. सोडतीत सर्वाधिक मागणी अत्यल्प गटासाठी असते अशावेळी यंदा मात्र या गटासाठी सर्वात कमी घरांचा समावेश असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने दिली. १५० च्या आसपासही घरे असण्याची शक्यता आहे. तर उच्च गटासाठी अंदाजे २०० घरे असण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी मध्यम आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे आहेत. मध्यम गटासाठी ७५० हून अधिक घरे असणार असून अत्यल्प गटासाठी ६०० हून अधिक घरे असण्याची शक्यता आहे. एकूण २०३० घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून याला म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: मुंबई: तोतया सीआयडी अधिकाऱ्याने घरात छापा टाकून २० लाख लुटले

विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईसह राज्यातील सोडत जाहीर व्हावी यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. त्यामुळे मुंबई मंडळाने आता जाहिरातीच्या कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आता जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ८ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर आचारसंहिता लागू होण्याआधीच सोडतीचा निकाल जाहिर करणे आवश्यक असल्याने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहिर केला जाण्याची शक्यता आहे. अद्याप सोडतीची तारीख निश्चित नसल्याचे सांगितले जात असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर ही सोडतीची तारीख असण्याची शक्यता आहे. एकूणच इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी, अर्ज सादर करण्यासाठी यंदा कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी तात्काळ आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याच्या तयारीला आता लागणे आवश्यक आहे.

हेही वाचा: मुंबई: अकरावीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर, ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईपाठोपाठ, कोकण आणि नाशिकचीही सोडत

मुंबईच्या सोडतीची जाहिरात या आठवड्यात प्रसिद्ध होणार असतानाच म्हाडा प्राधिकरण कोकण मंडळातील घरांसाठी ही सोडत काढण्याच्यादृष्टीने आग्रही आहे. तसे निर्देश कोकण मंडळाला देण्यात आले आहेत. तेव्हा कोकण मंडळही जाहिरातीच्या कामाला लागले आहे. अंदाजे ४ हजार घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. कोकणची जाहिरात आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरु होईल, पण सोडत मात्र आचारसंहितेनंतर जाहिर होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर दुसरीकडे नाशिकमधील १७०० घरांसाठीही आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे.