मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या आॅक्टोबर २०२४ मधील सोडतीतील ४४२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. त्यात एकापेक्षा अधिक घरांसाठी विजेत्या ठरलेल्या अर्जदारांचा समावेश असला तरी गतवर्षीप्रमाणे यंदाही घरे परत करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. यंदा २०१७ विजेत्यांना मंडळाकडून ई स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली आहे.

मुंबईतील बोरीवली, गोरेगाव, मालाड, अंधेरी, जुहू, विक्रोळी, पवई, दादर, वडाळा, वरळी, ताडदेव आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ८ आॅक्टोबरला सोडत काढण्यात आली. या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी झाले होते. तर २०३० घरांपैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने ८ आॅक्टोबरला २०१७ घरांसाठीच सोडत काढण्यात आली आणि एक लाख १३ हजार ५४२ अर्जदारांपैकी २०१७ अर्जदार विजेते ठरले. विजेत्या अर्जदारांना ११ आॅक्टोबरला ई स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार घर घेणार की परत (सरेंडर) करणार हे कळविण्यासाठी २० आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत रविवारी संपुष्टात आली असून विहित मुदतीत २०१७ पैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे. एकूण ४४२ अर्जदारांनी घरे परत केली असून ४५ जणांनी घराच्या स्वीकृतीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न

म्हाडाच्या मुंबईतील घरांना प्रचंड मागणी असली तरी मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे. त्याचवेळी अर्जदारांचे उत्पन्न आणि घरांची विक्री किंमत यात मोठी तफावत असल्याने विजेते ठरल्यानंतरही घरांची रक्कम भरु शकणार नसल्याने, गृहकर्ज उपलब्ध होत नसल्याने घरे परत करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. २०२३ च्या सोडतीतही ४५० हून अधिक घरे परत करण्यात आली होती. ही घरे विकली न गेल्याने त्यांचा समावेश २०२४ च्या सोडतीत मुंबई मंडळाला करावा लागला होता. यंदाच्या सोडतीतही घरे परत करणाऱयांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. महागडी घरे, उत्पन्न आणि घरांच्या किंमतीमधील तफावत तसेच गृहकर्ज न मिळण्याची शक्यता या कारणांमुळे ही घरे नाकारण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : ग्राहक आणि विकासक यांच्यातील ‘ सलोखा ‘ वाढला, महारेराच्या सलोखा मंचाकडून १७४९ तक्रारींचे निराकरण ५५३ तक्रारींवर सुनावणी सुरू

घरासाठी स्वीकृती देणार्या विजेत्यांपैकी ज्या विजेत्यांच्या घरांना निवासी दाखला मिळाला आहे. त्यांना आता लवकरच देकार पत्र वितरीत करून त्यांच्याकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. निर्माणाधीन आणि निवासी दाखला न मिळालेल्या इमारतीतील घरांसाठीच्या विजेत्यांना घराच्या ताब्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्या ४५ विजेत्यांनी स्वीकृतीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांना मुदतवाढ द्यायची का याबाबत विचार सुरु असून याबाबत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी निर्णय घेतील असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. सोडतीतील जी ४४२ घरे परत करण्यात आली आहेत, त्या जागी लवकरच प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. यंदा प्रतीक्षा यादीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे परत केली तरी त्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार असल्याने मागील सोडतीप्रमाणे यंदा मोठ्या संख्येने घरे विक्रीवाचून रिक्त राहणार नाहीत, असा विश्वासही अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.