मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सोडतपूर्व प्रक्रियेदरम्यान अर्ज भरताना, अर्ज दाखल करताना इच्छुक अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेत इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी, अर्ज कसा भरावा, काही अडथळे असल्यास ते कसे दूर करावेत या संदर्भातील इत्यंभूत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळाने एक ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही कार्यशाळा होणार आहे.
मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, मालाड, जुहू, पवई, ताडदेव, दादर, वरळी, विक्रोळी इत्यादी परिसरातील २०३० घरांसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प, अल्प मध्यम आणि उच्च अशा सर्व गटातील घरे या सोडतीत समाविष्ट आहेत. तर २४ लाख ते साडेसात कोटी अशा या घरांच्या किमती आहेत.
या सोडतीसाठीच्या अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रियेला ९ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस सुरुवात होऊन दहा दिवस उलटले तरी अर्जविक्री – स्वीकृतीस अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
महागडी घरे आणि अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अर्जांची संख्या कमी आहेत. शुक्रवारी,१६ ऑगस्ट पर्यंत ५४०३ अर्ज भरले गेले होते. तर अनामात रकमेसह त्यातील केवळ ३२४२ जणांनी अर्ज सादर केले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाच्या पणन विभागाने आणि म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाने अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि इतर अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही ऑनलाइन कार्यशाळा होणार आहे. यात मुंबई मंडळाच्या पणन विभागाचे उप मुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड आणि अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. अर्जदारांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे. अर्ज कसा भरावा, तो कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले जाणार आहे.
हेही वाचा…तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, तसेच नोंदणी करण्यास इच्छुक आहेत अशांना https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जात या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे आणि म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही कार्यशाळेची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज @mhadaofficial वरही या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तेव्हा या कार्यशाळेत अधिकाधिक अर्जदारांनी, इच्छुक अर्जदारांनी सहभागी होत आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा…मुंबईत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; अंबरनाथच्या ग्रामस्थांचे आयआरसीटीसी, ठेकेदाराविरोधात आंदोलन
दरम्यान म्हाडा सोडतीच्या पार्श्वभूमीवर दलाल सक्रिय झाले आहेत. सोडतीत घर मिळवून देण्याच्या नावे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. बनावट संकेतस्थळामुळेही काहीजणांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाबी उघड झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन केले आहे. कोणत्याही आमिषाला, भूलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन केले आहे.