मुंबई : विक्रीवाचून रिक्त घरे म्हाडाच्या कोकण मंडळासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. आजघडीला ११ हजारांहून अधिक घरे विक्रीविना रिकामी असून म्हाडाने या घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत केला आहे. त्यानुसार या घरांसाठी अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेला इच्छुकांनी प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे आता मंडळावर या घरांच्या विक्रीसाठी विशेष जाहिरात मोहीम राबविण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानुसार २ ते ११ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून याअंतर्गत २९ ठिकाणी मंडळाने स्टॉल लावले आहेत. महापालिका कार्यालय, रेल्वे स्थानक, चर्च, मंदिरे अशा ठिकाणी हे स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलद्वारे घरांची माहिती देऊन इच्छुकांना अर्ज नोंदणीकरीता सहाय्य केले जात आहे.

हेही वाचा…टपाली मते, मतदान यंत्रांमधील मतांमध्ये तफावत कशी? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल

कोकण मंडळाच्या म्हाडा गृहयोजनेसह पंतप्रधान आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना, १५ टक्के एकात्मिक योजना अशा योजनेतील घरेही रिक्त आहेत. ही घरे नेमकी का (पान ३वर)

‘प्रथम प्राधान्य’कडे इच्छुकांची पाठ

(पान १वरून) विकली जात नाहीत, याची विविध कारणे आहेत. घरांच्या दर्जापासून येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांपर्यंतच्या बाबींचा यात समावेश आहे. असे असले तरी घरे विकली जात नसल्याने मंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मंडळाने ‘पीएमएवाय’सह सर्व योजनेतील रिक्त अशा ११ हजारांहून अधिक घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वा’वर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार ११ ऑक्टोबरपासून प्रथम प्राधान्यअंतर्गत या घरांच्या विक्रीसाठी अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेस प्रतिसादच मिळत नसल्याने, अत्यंत कमी अर्ज सादर झाल्याने कोकण मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शेवटी मंडळाने आता जनजागृती मोहीम राबविण्याचा, स्वत: लोकांपर्यंत पोहचून त्यांना या घरांकडे आकर्षित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा…मुख्यमंत्री निवड उद्या; सीतारामन, रुपानी यांची केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती, शपथविधीच्या पूर्वसंध्येला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक

दरम्यान, या विशेष मोहिमेत विरार – बोळींजमधील दोन हजारांहून अधिक घरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण १४ हजार ४७ घरांसाठी ही विशेष मोहीम राबविली जात असल्याचेही गायकर यांनी सांगितले.

विशेष मोहीम

विशेष मोहिमेअंतर्गत वसई, विरार, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण,ठाणे, पालघर, डोंबिवली या महानगरपालिकेच्या कार्यालयात तर पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांत व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तसेच वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

महापे एमआयडीसीमधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विरार येथील जीवदानी देवी मंदिर, विरार चर्च, वसई चर्च, तसेच विरार रेल्वे स्थानक, वसई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वाशी, पनवेल, डोंबिवली, कर्जत, कल्याण या रेल्वे स्थानकांवरही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आल्याची माहितीही गायकर यांनी दिली. या स्टॉलवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. तर इच्छुकांना अर्जनोंदणीकरिता आवश्यक ते साह्य केले जाणार असल्याचेही मुख्य अधिकारी गायकर यांनी सांगितले.

हेही वाचा…‘गुरुजी’ पंकज त्रिपाठींच्या साक्षीने महाअंतिम सोहळा!

रिक्षांमधून घरांची माहिती

विविध ठिकाणी स्टॉल लावण्यासह मंडळाने जाहिरातीसाठी पथनाट्यांचाही आधार घेतला आहे. तर १० रिक्षांच्या माध्यमातूनही घरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविली जात आहे. अशा या विशेष मोहिमेला सोमवारपासून सुरुवात झाली असून ही मोहीम ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेद्वारे अधिकाधिक घरे विकली जातील अशी मंडळाला अपेक्षा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mhada over 11 000 unsold houses are included in the first priority plan mumai print news sud 02