मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ मध्ये झालेल्या सोडतीतील ३०६ विजेते आठ वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी ३०६ घरांचा समावेश असलेल्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने ताबा रखडला होता. तर आता काम पूर्ण झाले आहे, पण इमारतीला निवासी दाखला (ओसी) मिळत नसल्याने ताबा देता येत नसल्याचे चित्र आहे.

गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ प्रकल्पातील ३०६ घरांचा समावेश २०१६ च्या सोडतीत करण्यात आला. रखडलेल्या आणि वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकासातील ३०६ घरे सोडतीत समाविष्ट करण्यास अनेक अधिकाऱ्यांचा त्यावेळी विरोध होता. विकासकाने अर्धवट सोडून दिलेल्या प्रकल्पातील घरे कोण, केव्हा आणि कशी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित करत या घरांच्या सोडतीला विरोध होत होता. मात्र तरही तत्कालीन उपाध्यक्षांनी २०१६ च्या सोडतीत ३०६ घरांचा समावेश करून सोडत काढण्यात आली आणि या घरांच्या सोडतीला विरोध करणाऱ्यांची भीती मात्र खरी ठरली. कारण अजूनही, आठ वर्षांनंतरही या सोडतीतील विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटना आश्वस्त

वादग्रस्त पत्राचाळ प्रकल्प राज्य सरकारने विकासकाकडून काढून घेत म्हाडाच्या अर्धवट राहिलेला प्रकल्प पूर्ण करण्यास सुरुवात केली. पुनर्वसित इमारतीसह सोडतीतील घरांच्या इमारतीचेही काम हाती घेतले. त्यानुसार आता ३०६ घरांचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन चार-पाच महिने पूर्ण होऊन गेले. घराचे काम पूर्ण झाल्याने आठ वर्षाची प्रतीक्षा संपेल असे वाटत होते. मात्र त्यांची ही प्रतीक्षा काही संपताना दिसत नाही. कारण घराचे काम पूर्ण झाल्यानंतर ही केवळ निवासी दाखला नसल्याने ताबा रखडला आहे. याविषयी मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित यंत्रणांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्या सूचनांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करत निवासी दाखला घेत ताबा देण्यात येईल असे सांगितले. एकूणच आणखी काही दिवस या विजेत्यांना घराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Story img Loader