मुंबई : बेस्टच्या बसगाड्यांची हद्द ही फक्त मुंबईच्या सीमेपर्यंतच असली तरी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनी गाड्या नाशिक-कसारा मार्गावर दिसत चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच मुंबईतही अनेक ठिकाणी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या गाड्या अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत. भाडेतत्त्वारील गाड्यांचा गैरवापर सुरू असून त्यावर कोणाचाच अंकुश नसल्याचे दिसत आहे.
बेस्टच्या बसगाड्यांची सेवा ही केवळ मुंबईपुरती आहे. त्यातही पश्चिम उपनगराचे टोक म्हणून बेस्टच्या गाड्या भाईंदरपर्यंत धावतात. तर पूर्व उपनगरात बेस्टच्या गाड्या वाशी, मुलुंडपर्यंत धावतात. बेस्टच्या कंत्राटदार कंपनीचे रद्द झाल्यानंतर या गाड्या विविध ठिकाणी अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत. कोणामार्फत या गाड्या चालवल्या जात आहेत याची कोणतीही माहिती बेस्ट प्रशासनाकडे नाही. कंत्राटदार कंपनीकडे वाहतूकीचा परवाना असल्यामुळे या गाड्या चालवल्या जात असल्याचे उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मुंबईबाहेर ही गाडी जात असेल त्यावर आरटीओच्या मार्फत अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचेही मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा…मुंबई : बेस्ट बसचा प्रवास रखडला, प्रवासी बस थांब्यावरच उभे
गेल्या काही दिवसांपासून बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या गाड्या नाशिक कसारा मार्गावरही दिसत असल्याचे आढळून आले आहे, असा आरोप कामगार सेनेने केला आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी याबाबत बेस्ट प्रशासनावर आरोप केले आहे. भाडेतत्वावरील गाड्यांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्यात बेस्ट उपक्रमाचे नाव बदनाम होणार असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा…अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
आणिक आगारात बसगाड्यांवर झुडपे वाढली
बेस्टला भाडेतत्वावरील बसगाड्या पुरवण्यासाठी ज्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात सुरुवातीच्या काळातील एक कंत्राटदार कंपनी तोट्यात गेली. त्यामुळे ही कंपनी आणि बेस्टमधील करार रद्द झाला. कंपनीच्या ३०० बसगाड्या बेस्टच्या सेवेत होत्या. या कंपनीच्या गाड्या बेस्ट उपक्रमाने जप्त केला होत्या. जप्त केलेल्या गाड्या बेस्टच्या आणिक आगारात गेले वर्ष दीडवर्षे उभ्या आहेत. या गाड्यांभोवती आता झुडपेही वाढली आहेत. या कंपनीला बसगाड्या घेण्यासाठी ज्या बॅंकांनी किंवा आर्थिक संस्थांनी मदत केली होती त्या संस्थांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. जसजसे निकाल लागत आहेत तसतशा या गाड्या सोडवून नेल्या जात आहेत. मात्र या गाड्यांचे पुढे काय होते याचा कोणताही लेखाजोखा बेस्ट प्रशासनानकडे नाही. त्यामुळे या गाड्या बेस्टचे बोधचिन्ह न काढताच अनेक ठिकाणी वापरल्या जात आहेत. मुंबईत तर या गाड्यांच्या आडून लोकांची लूट सुरू असून लोकांची दिशाभूलही केली जात असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, या प्रकरणी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.