मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव शनिवारी संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवस असह्य उकाडा सहन करावा लागल्यानंतर रविवारी पहाटे गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान शनिवारच्या तुलनेत ३ अंशांनी कमी होते. तर कुलाबा येथे २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंदले गेले. हे तापमान शनिवारच्या तुलनेत ३ अंशांनी कमी होते. पुढील दोन तीन दिवसात मुंबईच्या किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा – हृदय शस्त्रक्रियेद्वारे तीन जणांना जीवदान! पश्चिम भारतातील दुर्मिळ शस्त्रक्रिया…
सोमवारपासून अनेक भागात किमान तापमान २० अंशाखाली असण्याची शक्यता आहे. तर काही भागात १५ अंश सेल्सिअस देखील राहील. कमाल तापमानाचा पारा मात्र या कालावधीत ३० ते ३२ अंशादरम्यान राहील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३०.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
मुंबईबरोबरच राज्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विविध भागात वाऱ्याच्या दिशेत बदल होतील. याचा थंडीच्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. किमान तापमानात हळूहळू घट होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.