मुंबई : मुंबईकर गेले दोन दिवस गुलाबी थंडीचा अनुभव घेत असून मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. तुलनेने उपनगरांतील पारा अधिक घसरला असून उपनगरातील किमान तापमान सोमवारी १४ अंश सेल्सिअस इतके होते.
गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशाच्या आसपास आणि किमान तापमान २० अंशापेक्षा अधिक नोंदले जात होते. मात्र, रविवारपासून त्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात १९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमनात घट नोंदवली गेली. पुढील तीन ते चार दिवस तापमानातील घट कायम रहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत किमान तापामन १५ ते १६ अंशदरम्यान राहील. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा >>>‘अदानी ट्रान्समिशनला कंत्राट देण्याचा निर्णय योग्य’; याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंड
मुंबईच्या प्रदूषणात वाढ
मुंबई शहर आणि उपनगरांत दोन्ही ठिकाणच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. समीर ॲपच्या नोंदीनुसार सोमवारी मुंबईत सर्वाधिक प्रदूषण नेव्ही नगर – कुलाबा येथे नोंदले गेले. तेथे हवा निर्देशांक ३१५ इतका होता. मुंबईत एकीकडे थंडी वाढत असताना, दुसरीकडे हवा प्रदूषणातही वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे आणि वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा स्तर घसरत आहे.