मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबईत सध्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत आहे. मेट्रो, उन्नत रस्त्यांसह अन्य प्रकल्पांचा यात समावेश आहे. मात्र काही कामांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रकल्पास विलंब होत आहे. अनेक प्रकल्पांतील काही कामांसाठी वाहतूक पोलीस विभागाशीसंबंधित विविध प्रकारच्या परवानग्या घेणे आवश्यक असून या परवानग्या मिळण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेता एकाच वेळी सर्व प्रकल्पातील पोलिसांशी संबंधित परवानग्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमवारी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एमएमआरडीएच्या नऊ प्रकल्पांतील पोलिसांशी संबंधित प्रलंबित परवानग्या मिळविण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. त्यामुळे आता नऊ प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे.
अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो २ ब, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६, गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ, वरळी-शिवडी उन्नत रस्ता आणि अन्य काही रस्ते प्रकल्पांची कामे सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहेत. मात्र या प्रकल्पातील काही छोट्या-मोठ्या कामांसाठी वाहतूक पोलिस विभागाशी संबंधित परवानग्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. परिणामी प्रकल्प पूर्णत्वावर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन नुकतीच पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे तसेच इतर अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी आयोजित केली होती. या बैठकीत या प्रकल्पांच्या परवानग्यासंबंधी सविस्तर चर्चा करून नऊ प्रकल्पांतील परवानग्यांचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
हेही वाचा…प्राण्यांच्या दहनवाहिनीच्या खर्चात बचत, गॅसची देयके १ लाखावरून ४० हजारांवर; दिवसातून दोनवेळा दहनविधी
मेट्रो, उन्नत रस्त्यासह अन्य नऊ प्रकल्पांतील १७ परवानग्या प्रलंबित होत्या. या परवानग्या सोमवारी देण्यात आल्याने आता हे नऊ प्रकल्प गती घेणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. मेट्रो २ ब मार्गिकेतील मिलन सब वे जंक्शनजवळ उंची गेजसाठी परवानगी, वांद्रे येथील एका ठिकाणची वाहतूक वळविण्यासाठी परवानगी आवश्यक होती. ही परवानगी आता मिळाली आहे. तर मेट्रो ६ मार्गिकेतील कामासाठी आयआयटी पवई ग्रिड अ येथील वाहतूक वळविण्यासाठी, साकी विहार ते रामबाग येथील वाहतूक वळविण्याची परवागनीही आता मिळाली आहे. शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पातील आचार्य दोंदे मार्गावरील काही सिंगल पोलचे स्थलांतर, आचार्य दोंदे मार्गावरील तुळई बसविण्यासाठी एलफिस्टन रस्ता बंद करण्यासाठीही आवश्यक असणारी परवानगी आता मिळाली आहे. तर अन्यही काही प्रकल्पांसाठीच्या परवानग्या मिळाल्या आहेत. आता परवानग्या मिळालेली कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.