मुंबई : विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये सजग राहून आपत्तीनुसार नागरिकांनी उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ‘आपदा मित्र’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन महिन्यांत ८२० स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी रस्त्यामध्ये घडलेल्या प्रसंगांमध्ये नागरिकांचे प्राणही वाचविले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’ संकटात धावून येत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नागरिकांना विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिकांसह धडे देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘आपदा मित्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे जानेवारी २०२३ पासून नियमितपणे १२ दिवसांचे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबईतील सुमारे ८२० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणाची शेवटच्या तुकडीचे प्रशिक्षण येत्या २७ मार्च २०२३ पासून सुरू होत असून,त्यामुळे प्रशिक्षित ‘आपदा मित्रां’ची संख्या ही एक हजार इतकी होईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
नुकतेच दादर पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ ५७ वर्षीय व्यक्तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती जमिनीवर कोसळली. यावेळी तेथे असलेला ‘आपदा मित्र’ विशाल रमेश वाघचौरे याने रुग्णवाहिका बोलवली आणि त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केले. त्यानंतर अंधेरी पूर्वेकडील साकीनाका सिग्नलजवळ दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. त्यावेळी अपघाताच्या ठिकाणाजवळ असलेला ‘आपदा मित्र’ प्रतिक गायकवाड यांनी धाव घेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. ना. म. जोशी मार्गावरील एका ठिकाणी दुचाकीमध्ये साप अडकला होता. यावेळी ‘आपदा सखी’ वैशाली कदम हिने यासंदर्भात तातडीने सर्प मित्र आणि पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सापाची सुखरूप सुटका करण्यात आली.
आपदा मित्रांना मिळणारे प्रशिक्षण
विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन करणे, पूरपरिस्थितीत बचाव व शोधकार्य करणे आदींचा प्रशिक्षणात समावेश आहे. त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरुपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी, एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेऊन मदतकार्य कसे करावे याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह ओळखपत्र देण्यात येत आहे.