मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वाढता उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवर पूर्व तपासणी, जनजागृती, निरोगी जीवनशैली, नवीन उपचार पद्धतींच्या धोरणांचा अवलंब, रुग्ण केंद्रित दक्षता आणि देखरेख प्रणाली इत्यादी योजनांचा अवलंब करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार मुंबईत प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे. तसेच महानगरपालिकेने नुकत्याच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप्स सर्वेक्षणानुसार’ मुंबईतील ३४ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब, तर १८ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळून आला आहे. मुंबईकरांमधील उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अन्य असंसर्गजन्य आजाराच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकरीता ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने १६ रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह विशेष तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. त्याचा विस्तार सर्व रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य स्वयंसेविका किंवा आशा सेविका या झोपडपट्टी आणि तत्सम वस्तीमधील प्रत्येक घरात जाऊन ३० वर्षांवरील व्यक्तींची उच्च रक्तदाबासंबंधी तपासणी करणार आहेत. रुग्णांवरील पुढील उपचारासाठी आरोग्यसेविका पाठपुरावा करणार असून, या रुग्णांना एचबीटी केंद्रात पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई: म्हाडा सोडतीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद; आतापर्यंत ९९ हजार इच्छुकांची नोंदणी
रुग्णांनी औषधोपचार पूर्ण करावेत यासाठी नवीन उपचार पद्धती तयार करण्यात आली आहे. निश्चित औषध संयोजन खरेदी करण्यात आले आहे. तसेच, रुग्ण स्मरण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाद्वारे समुपदेशन आणि पाठपुरावा करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने ‘आरोग्यम् कुटुंबम्’ या कार्यक्रमासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
वर्षभरात ४७ टक्के नागरिकांच्या तपासणीचे लक्ष्य
आरोग्यसेविकांच्या माध्यमातून शहरातील ३० वर्षांवरील व्यक्तींपैकी ४७ टक्के नागरिकांची २०२३-२४ मध्ये तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाच्या अंदाजीत रुग्णसंख्येपैकी ५० टक्के रुग्णांना देखरेखीखाली ठेवणे आणि ५० टक्के इतका पाठपुरावा व नियंत्रण दर गाठणे हे लक्ष्य ठेवले आहे. नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील एक दिवस बुधवार राखून ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिकेने तपासणीसाठी उच्च रक्तदाब उपकरणे व संच खरेदी केले आहेत.
तपासणी, उपचाराबरोबर समुपदेशन सुविधा पुरविणार
प्रत्येक आरोग्य सुविधा स्तरावर मधुमेहाची तपासणी आणि उपचार, तसेच आहार समुपदेशन सुविधा पुरविण्यात येणार आहे. जेणेकरून अनियंत्रित मधुमेहामुळे त्वचेवर होणारे अल्सर, डोळयांच्या पडद्याचे आजार, मज्जातंतूचे आजार, मूत्रपिंडाचे प्रदीर्घ आजार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे धोके कमी होऊन मृत्यूदर कमी होईल.