मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून शनिवारी एकाच वेळी संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पश्चिम उपनगरातील स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. दाटीवाटीच्या, अरुंद व झोपडपट्टी परिसरांमध्ये शिरून आयुक्तांनी स्वत: स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. यावेळी अंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक, लहान गल्लीबोळ यांची स्वच्छता करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका प्रत्येक प्रशासकीय विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबवित आहे. प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात परिमंडळांमध्ये ही मोहीम राबवली जात होती. स्वच्छता ही निरंतर प्रक्रिया असल्याने त्यात सातत्य राखायला हवे, या भूमिकेतून इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार यापुढे दर शनिवारी सर्व २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू

रस्ते, पदपथ, लहान गल्लीबोळांमध्ये घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, तसेच ब्रशिंग करून रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्त्यांवर उगवलेली खुरटी झुडपे समूळ काढणे, अवैध जाहिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्वच्छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहेत. इक्बाल सिंह चहल यांनी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून केलेल्या दौऱ्यात स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी आयुक्तांसह पालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

आयुक्तांनी अंधेरी पूर्व परिसरात जमनालाल बजाज नगर, गोरेगाव पश्चिम भागात विठ्ठलपाडा परिसरात अंतर्गत रस्ते, गल्लीबोळात जावून स्वच्छता केली. मोहिमेक सहभागी स्थानिक रहिवासी, तसेच शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत चहल यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

हेही वाचा – राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहा पटीने वाढ, ग्लोबल विकास ट्रस्टची उल्लेखनीय कामगिरी

स्वच्छता कशा प्रकारे करणे अपेक्षित आहे, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी नागरिकांना करून दाखवले. स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

बेवारस वाहनांमुळे स्वच्छतेला अडथळा

अंधेरी पूर्व विभागात स्वामी विवेकानंद मार्गावर ओमनगर येथे पदपथ व रस्त्यांच्या कडेला पाणी फवारणी करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे / दुचाकींमुळे स्वच्छता मोहिमेत अडसर निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संपूर्ण मुंबईत अंतर्गत रस्त्यांवर व इतरत्र रस्त्यांच्या बाजूला खूप दिवसांपासून उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे दैनंदिन स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचा वाहतुकीलाही त्रास होतो, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. यापुढे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी समन्वय साधून ही वाहने हटवण्याची कार्यवाही वेगाने करावी. स्वच्छता मोहिमेच्या बैठकांना वाहतूक पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mnc commissioner on the road for cleanliness drive sanitation was done by going into narrow settlements mumbai print news ssb
Show comments