मुंबई : नवीन निवृत्ती वेतन योजना बंद करून जुनी निवृत्ती वेतन योजाना लागू करावी या मागणीसाठी मंगळवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात दि म्युनिसिपल युनियन आणि मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने दोन वेगवेगळ्या मोर्चांचे आयोजन केले असून या मोर्चांत सहभागी होण्यासाठी कार्यालयात उपस्थिती नोंदवून हळूहळू कर्मचारी आझाद मैदानाच्या दिशेने निघू लागले आहेत. दरम्यान, संपात सहभागी होणार नसल्याचे समन्वय समितीने जाहीर केले आहे.
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी कार्यालयात उपस्थिती लावून आझाद मैदानात रवाना होऊ लागले आहेत. मात्र एकाच मागणीसाठी आझाद मैदानावर दोन वेगवेगळे मोर्चे काढण्यात आल्यामुळे कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचे, असा प्रश्न महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत एक लाखाहून अधिक कामगार, कर्मचारी व अधिकारी असून समन्वय समितीने वरील मागणीसाठी मोर्चा आयोजित केला आहे. मात्र महानगरपालिकेतील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार नाहीत, असे निमंत्रक ॲड. प्रकाश देवदास यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – मुंबई : लालबागमध्ये तरुणाची हत्या, गुन्हा दाखल
दि म्युनिसिपल युनियनचा दुपारी मोर्चा
मुंबई महापालिकेच्या सेवेत ५ मे २००८ व त्यानंतर नियुक्त झालेल्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी दि म्युनिसिपल युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी २ नंतर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चानंतर होणाऱ्या जाहीर सभेत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.