मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्याबाबतचा वाद संपल्यानंतर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महानगरपालिकेने लेखी परवानगी दिली. ठाकरे गटाला मेळाव्यानिमित्त २३ व २४ ऑक्टोबर रोजी मैदान वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देताना १८ विविध अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिक आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.
शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या गटांकडून परवानगीसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे ऑगस्ट महिन्यातच दोन अर्ज सादर करण्यात आले होते. मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता. त्यातच मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी दिलेला अर्ज मागे घेतला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ट्विटरवरून तसे जाहीर केले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र ठाकरे गटासाठी रीतसर लेखी परवानगी जी उत्तर विभागाने गुरुवारी दिली. विभागप्रमुख महेश सावंत यांनी कार्यालयात जाऊन ही परवानगी घेतली. परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या मंजुरीने ही परवानगी देण्यात आली असून नेहमीच्या अटी शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे. त्यात वेळ, ध्वनी प्रदूषणाबाबतच्या अटी घालण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, न्यायालयाच्या अटींचे पालन, पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी, मैदानात वाहनाला प्रवेश मनाई, व्यासपीठाची संरचनात्मक तपासणी अशा १८ विविध अटी घालण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – मुंबई : दादरमध्ये अनधिकृतपणे फुल विक्री करणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई
दोनच दिवसांची परवानगी
दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी पालिकेकडून शिवसेनेला दोन दिवस परवानगी देण्यात येते. गेल्यावर्षी २०२२ मध्ये न्यायालयाने चार दिवसांची परवानगी दिली होती. यंदा ठाकरे गटाला २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी परवानगी दिली असल्याची माहिती विभागप्रमुख महेश सावंत यांनी दिली. पूर्व तयारीसाठी आधीचा एक दिवस देण्यात आला आहे. २० हजार रुपये अनामत रक्कम व प्रति दिवस २५० रुपये अधिक वस्तू व सेवा कर असे भाडे भरून ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे.