मुंबई : लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या आठ दहा दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण करण्याचा सपाटा सुरू आहे. सोमवारी सागरी किनारा मार्गाच्या एका मार्गिकेचेही लोकार्पण करण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अनेक नवीन प्रकल्पांच्या उद्घाटनाचे मुहूर्त साधले आहेत.

येत्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेचे विविध लहान-मोठे प्रकल्प, विकासकामांचे लोकर्पण करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली असल्यामुळे सध्या पालिकेत प्रशासकांची राजवट सुरू आहे. त्यामुळे हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहेत. शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हे लोकार्पणाचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या या कामांचे श्रेय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळते असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

विविध विकासकामांच्या लोकार्पणाला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरूवात झाली. त्यात वरळी कोळीवाडा येथील सी फूड प्लाझा म्हणजेच बचत गटांसाठी कोळी खाद्यपदार्थ विक्री केंद्रे सुरू करण्यात आले आहे. तसेच विजेवर चालणाऱ्या फूड ट्रकचे वितरणही करण्यात आले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. केईएम रुग्णालयातील डायलिसिस युनिट, न्युरोलॉजी आयसीसू, न्युरोसर्जरी आयसीयू, हिरकणी कक्ष यांचेही लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

पालिकेने मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी पहिले केंद्र गिरगावात सुरू करण्यात आले आहे. त्याचेही लोकार्पण गेल्या आठवड्यात पार पडले. नोकरदार महिलांसाठी मुंबईतील पहिले वसतिगृह गोरेगाव येथे उभारण्यात आले असून त्याचेही नुकतेच लोकार्पण करण्यात आले. तसेच सोमवारी पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. केम्पस कॉर्नर परिसरात रविवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृती जागवणाऱ्या भित्तीचित्राचे लोकर्पण पार पडले.

Story img Loader