मुंबईत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’, असा धमकीवजा इशाराच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

रविवारी विक्रोळीत मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी दुकान मालकांना निवेदन दिले जात होते. यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेत मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि अन्य चार जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेच्या गुंडांनी परत मारा खाल्ला, असं खोचक ट्विट त्यांनी केले होते.

विक्रोळीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हल्ला केला. कार्यालयातील काचा आणि सामानाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ‘ईद’निमित्त कार्यालय बंद होते, असे समजते. या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यालयाची पाहणी करणार आहेत. सुरुवातीला हा हल्ला कोणी केला याबाबत संभ्रम होता. मात्र, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विटर हा हल्ला मनसेनेच केल्याचे सांगितले आणि संभ्रम दूर झाला.

Story img Loader