Mumbai Molestation Case : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. मुंबईसह आजूबाजूच्या विविध शहरांत आणि राज्यातील विविध ग्रामीण भागातही महिला अत्याचारच्या घटनांची नोंद होत आहे. एवढंच नव्हे तर लहान मुलींनाही यात लक्ष्य केलं जात आहे. आता मुंबईतील बोरीवलीमध्येही असाच प्रकार उजेडात आला आहे. एका १५ वर्षीय मुलीला एका रिक्षाचालकाने अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना हा प्रकार घडला. आरोपी रिक्षाचालकाने रिक्षा अचानक थांबवली आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे मुलीने तत्काळ आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. परंतु, तो लगेच तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणीच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात असन आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाणार आहे.
हेही वाचा >> मुंबईत वर्षभरात विनयभंगाच्या दोन हजारांहून अधिक घटना
दरम्यान, देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मुंबईत गेल्या वर्षभरात विनयभंगाचे सुमारे दोन हजार गुन्हे दाखल झाल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. तसेच, बलात्कारप्रकरणी ९०० हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आल्याचे माहिती अधिकारातून निदर्शनास आले आहे. दरम्यान, एका वर्षात महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो नियमांतर्गत तब्बल ४,३५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१ जुलै २०२३ ते जून २०२४ दरम्यान मोबाइल आणि सोनसाखळी चोरी, दरोडे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हे, खून, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, सेवन आदी घटनांमध्ये २५ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आल्याची बाब माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उघडकीस आली आहे. मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे २२५३ गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. तर, बलात्काराच्या प्रकरणात ९६४ गुन्हे दाखल झाले आहेत.
वर्षभरातील नोंद गुन्हे
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे – १२,७६७
अंमली पदार्थ विक्री, सेवन – ८,९८२
पॉक्सो – १,१३४
दरोडो – १,३३४
विनयभंग – २,२५३
बलात्कार – ९६४
खून, खुनाचा प्रयत्न – ४४४
चोरी – ४८५