ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, मोनोमार्गाच्या बांधकामामुळे होणारा आवाज, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना तोंड देता देता मुंबईकर मेटाकुटीला आले होते. मात्र गेल्या रविवारपासून मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या मोनोरेलला पहिल्याच आठवडय़ात मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला. पहिल्याच आठवडय़ात मोनोच्या तिकीट विक्रीने एक लाखाचा आकडा पार केला आणि तब्बल १४ लाख रुपयांची घसघशीत कमाई केली. त्यामुळे पहिल्या दिवशी ‘मोनो डार्लिग’ ठरलेली मोनो रेल आठवडय़ाअंती ‘मनी’ रेल बनून धावत आहे.
वडाळा ते चेंबूर या मार्गावर धावणाऱ्या मोनो रेलला मुंबईकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. पहिल्या दिवशी गर्दीचा महापूर लक्षात घेऊन प्रशासनानेही जादा फेऱ्या चालवल्या. मात्र मोनोबाबतची ‘नव्याची नवलाई’ आठवडा संपला, तरी ओसरलेली नाही. पहिल्या आठवडय़ात १ लाख ३६ हजार ८६५ मुंबईकरांनी मोनोची सफर केली. आठवडाभरात १ लाख ३२ हजार ५२३ तिकिटांची विक्री झाली. तर तब्बल १४०९ लोकांनी कूपन्स घेऊन प्रवासाचा आनंद लुटला. आठवडाभरात मोनो रेलने एकूण ५१२ फेऱ्या केल्या. पहिल्याच आठवडय़ात मोनोचे उत्पन्न १४ लाख २४ हजार ८१० रुपये एवढे झाले.

Story img Loader