मुंबईकरांचा वेळ वाचवणाऱ्या बहुप्रतीक्षीत मोनोरेलचे आज उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चेंबूर स्टेशनवर मोनोला हिरवा झेंडा दाखवला. उद्यापासून ही लालपरी मुंबईकरांसाठी खुली होईल. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मोनोरेल उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. पहिल्या टप्प्यात वडाळा ते चेंबूर दरम्यान ही मोनोरेल धावणार आहे. जवळपास 9 किलोमीटरचा हा टप्पा आहे. आणि सुरुवातीला सकाळी ७ ते दुपारी ३ दरम्यान ही मोनोरेल धावेल. त्यानंतर मात्र लोकलप्रमाणेच तीही मुंबईकरांच्या सेवेसाठी पहाटेपासून रात्री 12 पर्यंत हजर असेल.लोकलच्या काही महत्वाच्या स्टेशनला मोनोरेल लिंक करण्यात आली आहे. चेंबूर स्टेशनवरुन मोनोरेल पकडण्यासाठी एक खास स्कायवॉकही बांधण्यात आला आहे. पण लोकलप्रमाणे इथं मासिक पासची सुविधा मात्र नसणार आहे. पण मुंबईच्या पूर्व भागातल्या वाहतुकीचा ताण मोनोरेलमुळे कमी होईल अशी आशा आहे.रंगीबेरंगी आणि वातानुकूलित मोनोरेल चेंबूर-वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असून आरंभी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत दर १५ मिनिटांनी मोनोरेलची फेरी होणार आहे. महिनाभरानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने मोनोरेलच्या सेवेचा कालावधी आणि फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मोनोरेलमुळे चेंबूर ते वडाळा दरम्यानचा प्रवास अवघ्या १९ मिनिटांत होणार आहे. एरवी बसने हे अंतर कापण्यासाठी जवळपास ४० मिनिटे लागतात. मोनोरेलसाठी वडाळा येथे साडेसहा हेक्टर परिसरात कारडेपो उभारण्यात आला आहे. एकावेळी २१ मोनोरेल उभ्या राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या डेपोमध्ये मोनोरेलचा नियंत्रण कक्ष, प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा आहेत. मोनोरेलमध्ये अत्याधुनिक ब्रेक लावल्यानंतर घर्षणातून तयार होणारी विद्युत शक्ती वापरण्याची सोय आहे. त्यामुळे सुमारे २५ टक्के विजेचा पुनर्वापर होणार आहे. त्याचबरोबर मोनोरेलच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक अशी व्यवस्था आहे.
मोनोरेल स्थानकांवरून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ‘बेस्ट’च्या बसची सुविधा असणार आहे. त्यासाठी ‘बेस्ट’ने या मार्गावर नव्याने फेऱ्या सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

Story img Loader