नियमित प्रवास करणाऱ्यांचे हाल

आगीच्या घटनेपासून बंद ठेवण्यात आलेली मोनोरेलची सेवा सात दिवस उलटल्यानंतरही सुरू झालेली नाही. प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्याने मोनोसेवा रडतरखडत सुरू असली तरी, चेंबूर ते वडाळादरम्यानच्या विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्यांसाठी वाहतुकीचा हा पर्याय सुलभ ठरत होता. मात्र गेल्या आठवडाभरापासून मोनोरेल बंद असल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच मोनोच्या नियमित प्रवाशांनी आपला मोर्चा रस्तेमार्गाकडे वळवल्याने चेंबूर परिसरातील वाहतूक कोंडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

चेंबूरच्या माहुल परिसरात अनेक तेल, वीज आणि गॅस कंपन्या असल्याने या ठिकाणी रोज मोठय़ा प्रमाणात कामगारांची ये-जा असते. चेंबूर रेल्वेस्थानकाशी जोडलेली असल्याने येथून माहुल परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोनोसेवेचा मोठा आधार होता, मात्र ९ नोव्हेंबर रोजी मोनोचा डबा आगीत भस्मसात झाल्यापासून ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मोनोचा जळालेला डब्बा बाहेर काढण्यात आला. तरीही दुरुस्तीचे काम सुरूच आहे. मात्र सेवा ठप्प झाल्याचा परिणाम शाळकरी मुले आणि या परिसरात कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोसावा लागत आहे.

मोनोमार्गाच्या उभारणीसाठी चेंबूरच्या आर.सी. मार्गावर मोठमोठे खांब उभारण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी वाढली आहे. चेंबूर आणि कुर्ला रेल्वे स्थानकातून माहुल परिसरात पोहचण्यासाठी पूर्वी केवळ १५ ते २० मिनिटांचा अवधी लागत होता. मात्र मोनोच्या खांबामुळे रस्ता आक्रसल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच आता मोनोची सेवाही बंद झाल्याने या वाहतूक मार्गाने जाणारे प्रवासीही रस्तेमार्गाने प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

आणखी आठवडाभर सेवा बंद?

मोनोरेलचा अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. अपघातांमागील कारण शोधण्याबरोबरच भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याकरिता उपाययोजना सुचविण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले आहे. यावर योग्य ती कार्यवाही करुन चाचणी पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पूर्ववत केला जाणार असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशी समितीला दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. यामुळे ही सेवा आणखी आठवडाभरासाठी तरी बंद राहील असा अंदाज आहे. दरम्यान अहवाल आल्यानंतर, योग्य ती कार्यवाही केल्यानंतर सेवा सुरू करण्याबाबत निश्चित तारीख जाहीर करू, असे एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवटकर यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीचा सामना करण्याऐवजी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मोनोनेच प्रवास करत आहोत. मात्र गेल्या सात दिवसांपासून मोनो बंद असल्याने नाइलाजास्तव आम्हाला बसने प्रवास करावा लागत आहे.

– विवेक यादव, प्रवासी

मी चेंबूर वाशी नाका येथे राहतो. माझी शाळा चेंबूर नाका येथे आहे. बसने येण्यापेक्षा मला मोनोनेच प्रवास करणे सोयीचे जाते. मात्र मोनो बंद असल्याने सध्या मी चालतच शाळेत जातो.

– सुहास जाधव, विद्यार्थी

‘मोनो-२’चाही मुहूर्त हुकणार ?

वडाळा-जेकब सर्कल मार्गावरील चाचण्यांचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई : चेंबूर ते वडाळा या मोनोरेल मार्गावर मैसूर कॉलनी स्थानकाजवळ आग लागल्यानंतर ही सेवा सात दिवसांनंतरही बंदच आहे. या घटनेचा फटका डिसेंबर महिन्यात नागरिकांसाठी खुल्या होणाऱ्या वडाळा ते जेकब सर्कल या मोनो-२ मार्गाच्या चाचणीच्या कामालाही बसला आहे. परिणामी हा मार्ग कार्यान्वित होण्याची मुदत पुन्हा हुकण्याची चिन्हे आहेत.

मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा या उद्देशाने शहरात चेंबूर ते जेकब सर्कल असा २० किमीचा मोनोरेल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गातील चेंबूर ते वडाळा हा ८.८ किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. यानंतर वडाळा ते जेकब सर्कल या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून या मार्गावर सध्या मोनोरेलची चाचणी सुरू आहे. पण गुरुवारी झालेल्या आगीच्या घटनेनंतर संपूर्ण मोनो मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे सध्या चाचण्या होत नसून चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे सुरक्षा मंडळाकडे जाता येणार नाही. यामुळे हा मार्ग सुरू होण्याची डिसेंबरची मुदतही हुकण्याची शक्यता आहे. यापूर्वी मोनो-२ची ‘डेडलाइन’ पाचपेक्षा अधिक वेळा हुकली आहे. यामुळे आता डिसेंबरचा मुहुर्त साधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. सध्या प्राधिकरणाकडे दहा मोनोच्या गाडय़ा आहेत. यापैकी चार गाडय़ा सध्याच्या मार्गावर धावत आहेत. त्यातील दोन गाडय़ांमध्ये मोठा बिघाड झाला आहे. तर एका गाडीला आग लागल्यामुळे आता ती निकामी झाली आहे. यामुळे प्राधिकरणाला २० किमीच्या मार्गावर सातच गाडय़ा उपलब्ध आहेत. पण चाचणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा मंडळाने हिरवा कंदिल दाखवल्यावर डिसेंबरमध्ये या सेवेचे लोकार्पण केले जाईल असे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले. मात्र, गाडय़ांच्या कमतरतेमुळे मोनोच्या फेऱ्यांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तांत्रिक अडचणी

या मार्गावर चाचणी करत असताना संवाद यंत्रणाच काम करत नसल्याचे समोर आले. जर ही यंत्रणा कार्यरत नसेल तर गाडय़ा चालविणे अवघड होणार आहे. यामुळे या गाडय़ा बनविणाऱ्या स्कोमी इंजिनीअरिंग या मलेशियन कंपनीला सूचना करण्यात आल्या असून त्यानुसार आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे मार्गाचे लोकार्पण आधीच लांबले होते. आता हा मार्ग खुला होईपर्यंत चाचण्या घेणेही शक्य  नाही.

Story img Loader