पावसाळय़ाच्या ऐन सुरुवातीला पूर्व मुक्त मार्ग मुंबईकरांसाठी खुला केल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा हा ८.८ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा ऑगस्टमध्ये सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मोनोच्या स्थानकांचे उरलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मोनोरेल सुरू झाली की सध्या चेंबूर ते वडाळा प्रवासासाठी लागणारा पाऊण तासांचा कालावधी अवघ्या १९ मिनिटांवर येईल.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या २० किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे २३०० कोटी रुपये असून त्यापैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल असे ‘एमएमआरडीए’ने नवीन वर्षांच्या आरंभी जाहीर केले होते. चेंबूर ते वडाळा या सुमारे नऊ किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या प्रवाशांना खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणाऱ्या बसमधून तब्बल ४० मिनिटे प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक होते. पण ऑगस्टपासून चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६० आहे. त्यामुळे जवळपास नऊ ते दहा बसचे प्रवासी एकावेळी मोनोरेलमध्ये सामावले जातील.
ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यावरील मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठी गेले काही महिने मोनोरेलच्या चाचण्या घेण्यात आल्या. मोनोरेल मार्गाचे बांधकाम, त्याची सुरक्षितता, मोनोरेलची चाचणी अशा विविध गोष्टी यामध्ये पडताळून पाहण्यात आल्या. आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने काम सुरू असून प्रामुख्याने मोनोरेल मार्गावरील स्थानकांचे काम पूर्ण करण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यात मोनोरेल मार्गावर चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा अशी सात स्थानके आहेत. सातही स्थानकांच्या बांधकामाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. आता रंगरंगोटी, तिकीट खिडक्या आदी अंतर्गत व्यवस्था उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यादृष्टीने कामही सुरू आहे. मोनोरेल मार्ग व त्याच्या चाचणीची आता कसलीही अडचण नाही. स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. सारी तयारी झाली की आम्ही मोनोरेल सुरू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे परवानगीचा अर्ज करू, असे ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

सातही स्थानकांचे बांधकाम पूर्ण!
या पहिल्या टप्प्यात मोनोरेल मार्गावर चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा अशी सात स्थानके आहेत. सातही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, तिकीट खिडक्या आदी अंतर्गत व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

चेंबूर ते वडाळा १९ मिनिटांत
चेंबूर ते वडाळा या सुमारे नऊ किमीच्या प्रवासासाठी सध्या खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणाऱ्या बसमधून तब्बल ४० मिनिटे प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक होते. पण ऑगस्टपासून चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६० आहे. त्यामुळे जवळपास नऊ ते दहा बसचे प्रवासी एकावेळी मोनोरेलमध्ये सामावले जातील.