लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जुलै अखेरीस कोसळलेल्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली. अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर बेहाल झाले होते. दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी पहाटे उपनगरांत पावसाचे पुनरागमन झाले. दरम्यान, मुंबईत मंगळवारी हलक्या सरींची, तर ठाणे, पालघर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहतील, असाही अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

शहर, तसेच उपनगरांत ऑगस्टच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, वांद्रे – कुर्ला संकुल, मरोळ, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली परिसरात मंगळवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली.

आणखी वाचा-Police Recruitment in December: डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे

राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दरम्यान, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडू, कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.