आगामी लोकसभा निवडणुकाजवळ येऊन ठेपल्यामुळे मतदारसंघाच्या भल्यासाठी आपल्या खासदार निधीची वापर करण्याची चढाओढ सध्या मुंबईतील खासदारांमध्ये बघायला मिळत आहे. निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदारांनी अधिकाधिक निधीचा वापर करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी सध्या मुंबई आणि उपनगरांतील जिल्हाधिका-यांच्या कार्यालयात खासदार निधीचा वापर करू देण्यासाठीच्या विनंती अर्जांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. मागील आठवड्यात मुंबई उपनगरातील जिल्हाधिका-यांच्या कार्यालयात एकाच दिवशी अशाप्रकारच्या तब्बल १०० अर्जांची प्रक्रीया पार पडली. खासदारांना आपल्या कार्यकाळातील पहिल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत आपल्या निधीचा विनियोग करण्यात आलेल्या अपयशामुळे सरकारी आस्थापनांतील कर्मचा-यांना शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागते आहे. याबद्दल विचारले असता बहुतांश खासदारांनी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्यात दिरंगाई झाल्यामुळे शेवटच्या क्षणी अशाप्रकारे धावपळ करावी लागत असल्याचे सांगितले. मात्र खासदारांचा निधी खर्च करण्याच्या लगीनघाईकडे बघता “होऊ दे खर्च… कारण निवडणुकीचे आहे वर्ष” असेच म्हणावे लागेल.
मुंबईतील खासदारांनी आतापर्यंत किती निधी खर्च केला याचा जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध झालेला अधिकृत तपशील पुढीलप्रमाणे:-
दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार एकनाथ गायकवाड यांनी आतापर्यंत ६.३८ कोटींचा निधी खर्च केला असून, सध्या त्यांच्या मतदारसंघात ११.४० कोटींच्या १०८ विकासकामांचा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती करण्यात आली आहे.
उत्तर-मध्य मुंबईतील खासदार प्रिया दत्त यांनी चालू वर्षात ६.८१ कोटींची कामे करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्य़ालयाकडे केली आहे. आतापर्यंत प्रिया दत्त यांच्या एकूण १४ कोटींच्या खासदार निधीतील फक्त १०.९५ कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले आहेत.
काँग्रेस खासदार गुरुदास कामत यांनी आपल्या आग्नेय मुंबई मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांत विकासकामांसाठी एकूण उपलब्ध निधीपैकी फक्त ७.६० कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या त्यांच्या विभागात तब्बल ६.४० कोटींची विकासकामे प्रलंबित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सध्या ५.६५ कोटींचे विकासप्रकल्पांचे काम हाती घेतले आहेत.
उत्तर मुंबईचे खासदार संजय निरूपम यांच्या मतदारसंघात ५.९७ कोटी तर दक्षिण मुंबईतील राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार मिलिंद देवरा यांच्या लोकसभा मतदारसंघात ५.३५ कोटींचे विकासप्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा