मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात मराठी माणसाला घर देणार नाही असं म्हणणाऱ्यांना मनसेने आता चांगलाच दणका दाखवला आहे. तसंच संबंधित व्यक्तींना माफी मागायला लावी असून या पुढे असं करणार नाही असंही मनसेने वदवून घेतलं आहे. तृप्ती देवरुखकर या महिलेने त्यांना आलेला घर घेण्याबाबतचा अनुभव हा त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने तातडीने संबंधित सोसायटीमध्ये धाव घेत आपल्या स्टाईलने मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांना इशारा दिला. ज्यानंतर या लोकांनी माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तृप्ती देवरुखकर यांनी व्हायरल व्हिडीओत त्यांनी काय म्हटलं आहे?

“जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकीय वापर करणं बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं सांगितलं. नियमावली मागितली तर धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीत परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही तर संताप आहे. आज मला जो अनुभव आला तो किती मराठी माणसांना आला असेल? किती जणांना घरं नाकारली गेली असतील?” असे प्रश्न विचारत तृप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी या सोसायटीत पोहचले. त्यांनी इशारा दिल्यानंतर या सोसायटीतल्या लोकांनी माफी मागितली. यानंतर आता मनसेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हटलं आहे मनसेने?

तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं ‘देश तोडणारे खलनायक’ म्हणून चित्रं उभं केलं जातं आणि आपलेच मराठी जाणते मान्यवर आम्हाला संकुचित ठरवून मोकळे होतात.

आज तृप्ती देवरुखकर ह्यांना आलेल्या अनुभवानंतर तत्परतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून गेली. त्या माणसाला जाहीर माफी मागायला लावली. पण हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण हिणवणं, तुच्छ लेखणं, तुसडेपणाने वागवणं हे मराठी माणूस रोज मुंबईच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अनुभवत असतो पण मुंबई-महाराष्ट्रावर इतकी वर्ष राज्य करूनही कोणताही राज्यकर्ता इतरांची मतं जातात म्हणून ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मराठी जनांनी हे लक्षात घ्यायला हवे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mulund west trupti deorukhkar shared video denying house to marathi manus in mumbai mns takes action scj
Show comments