मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र केली आहे. गेले वर्षभर महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू होती. गेल्या वर्षभरात पाच हजार किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले असून महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या पथकांनी कारवाईदरम्यान ७९ लाख ३० हजार रूपये दंड वसूल केला आहे. प्लास्टिक विरोधातील कारवाईत आतापर्यंत ३७ जणांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका (प्रकल्प) आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार विभागाच्या पथकांनी मुंबईत प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली होती. १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत एकूण एक लाख ७५ हजार ८४१ प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. भेटींदरम्यान झालेल्या कार्यवाहीत एकूण ५ हजार २८५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण १ हजार ५८६ प्रकरणांमध्ये ७९ लाख ३० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपायुक्त (विशेष प्रकल्प) संजोग कबरे यांनी दिली.

हेही वाचा : मुंबई-जीवी : कुशल वास्तुकार शिंपी

करोना कालावधीनंतर १ जुलै २०२२ पासून या विभागांमार्फत दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली होती. मात्र तत्पूर्वी करोना संकटामुळे दोन वर्ष प्लास्टिकविरोधातील कारवाई थंडावली होती.आता महानगरपालिकेने पुन्हा एकदा तीव्र कारवाई सुरू केली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले इत्यादी ठिकाणी कारवाई हाती घेण्यात आली आहे. आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी सखलभागात पाणी साचण्यास कारणीभूत ठरणार्‍या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला.

हेही वाचा : महिलांनो ओढणी गळ्यात घेऊन बाईकवर बसताय? वसईतील हृदयविदारक घटना डोळे उघडेल, मंदिरातून येतानाच…

मुंबई महानगरपालिकेने आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत समन्वयाने सोमवारपासून प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. या पथकामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबतच मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai muncipal corporation plastic ban campaign seized 5000 kgs plastic and collected fine of rupees 79 lakh mumbai print news css