मुंबई : हवेतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन कामाला लागले असून मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झाली आहे. यानुसार ६५० किमी लांबीचे रस्ते नियमितपणे धुण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरातील हवा प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केली होती. त्यानुसार हवा प्रदूषणाच्या निरनिराळय़ा उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी सर्व संबंधितांसह व्यापक बैठक घेतली. बैठकीत रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>> ‘दर्जेदार मनोरंजनावर पोसलेला समाज सशक्त’; ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान
रस्ते व पदपथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबई महानगरात सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.
वर्दळीच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित
धूळ नियंत्रण मोहिमेअंतर्गत ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता करण्यात येत आहे. धूळ हटवण्यासाठी पाणी फवारणी करण्यात येत आहे. ज्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्यांची निवड विभाग कार्यालयांनी केलेली आहे. जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते, अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सहा ठिकाणे हवा प्रदूषणाच्या विळख्यात
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील नागरिक हवा प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. सातत्याने खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुंबईतील एकूण सहा ठिकाणांच्या वातावरणात ‘पीएम २.५’ हा घटक वाढल्याने येथे मोठय़ा प्रमाणात धुरके वाढले आहे. दरम्यान, हवेच्या दृश्यमानतेवर परिणाम करणारा ‘पीएम २.५’ हा घटकदेखील मुंबईच्या हवेत पसरत आहे. शीव, मुलुंड पश्चिम, कुलाबा, कांदिवली पूर्व, नेव्ही नगर – कुलाबा आणि वांद्रे – कुर्ला संकुल आदी ठिकाणच्या हवेत ‘पीएम २.५’ घटक मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.