मुंबई : सागरी किनारा मार्गालगत अमरसन्स उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने अखेर रद्द केला. ब्रीच कॅण्डी येथील रहिवासी संघटनेने येथे वाहनतळ करण्यास प्रचंड विरोध केला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर माघार घेतली. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्यानंतर आता प्रकल्प रद्द केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचे अधिदान करावे लागणार आहे. परिणामी, प्रकल्प रद्द केल्याने महापालिकेला भुर्दंड बसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागरी किनारा मार्ग हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून जमीन तयार करण्यात आली आहे. या भराव जमिनीपैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ५३ हेक्टर जागेत हरित क्षेत्र व नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यात, प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त वरळी, हाजीअली व अमरसन्स उद्यान अशा तीन ठिकाणी चार भूमिगत वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. या वाहनतळांची क्षमता १ हजार ८५६ एवढी वाहने राहतील एवढी असणार आहे. मात्र, ही वाहनतळे उभी राहण्याआधीच ब्रीच कॅण्डी परिसरातील नागरिकांनी अमरसन्स उद्यानातील वाहनतळाला विरोध केला होता. डिसेंबर महिन्यात येथील रहिवाशांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेटही घेतली होती.

हेही वाचा >>>आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ; ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होत आलेले असताना पालिका प्रशासनाने आता भराव जमिनीवर इतर सुविधा देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात भूमिगत वाहनतळांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होणार होती. मात्र, ब्रीच कॅण्डी येथील नागरिकांनी अमरसन्स उद्यानातील वाहनतळाला विरोध केल्यामुळे या ठिकाणचे काम थांबवण्यात आले होते. रहिवाशांच्या प्रचंड विरोधामुळे अखेर पालिका प्रशासनाने अमरसन्स उद्यानातील वाहनतळ प्रकल्प रद्द केला आहे.

भूमिगत वाहनतळासाठी कंत्राटदाराने या ठिकाणी जमिनीखाली दोन मजल्यांपर्यंत खोदकाम केले आहे. मात्र, प्रकल्प रद्द झाल्यामुळे आता प्रकल्पस्थळ सुरक्षित पातळीवर आणून बंद करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. या जागेवर नागरिकांच्या उपयोगाची दुसरी कोणती सुविधा देता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्र उभारता येईल का याबाबतही विचार सुरू आहे. –अमित सैनी, अतिरिक्त आयु्क्त, मुंबई महानगरपालिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal administration has cancelled the project to build an underground parking lot near amarsons park along the coastal road mumbai print news amy