मुंबई : सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगात लावण्यात येणाऱ्या गाड्यांच्या स्पर्धांना अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने सह पोलिस आयुक्तांना (वाहतूक) पत्रही पाठवले असून सागरी किनारा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोलिस तैनात करण्याची विनंती करण्यात आली आहे. सागरी किनारा मार्गावर ताशी ६० ते ८० किमी वेगमर्यादा अपेक्षित असून काही वेळ यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात व त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागरी किनारा मार्ग विनाअडथळा, विनासिग्नल मार्ग असल्यामुळे त्यावरून जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेगमर्यादा ओलांडतात. तसेच सागरी किनारा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी गाड्यांची स्पर्धा सुरू असल्याचा आरोप येथील काही नागरिकांनी केला होता. रात्री १० ते १२ या वेळेत श्रीमंतांच्या महागड्या गाड्या, मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार यांची स्पर्धा व त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अशा भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्या आणि त्यांच्या स्पर्धांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने आता वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे. याकरीता सह पोलिस आयुक्तांना पत्र पाठवण्यात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.

हेही वाचा…बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण

विनाअडथळा वेगवान प्रवासाची हमी असल्यामुळे रात्री १० नंतर या मार्गावर भरधाव वेगात गाड्या चालविण्यात येतात, असा आरोप येथील नागरिकांनी केला होता. रात्री १० ते १२ या वेळेत या मार्गावर चार चाकी गाड्यांची स्पर्धा सुरू असते. या परिसरातील रहिवाशांनीही डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांना पत्र पाठवले होते. आता पालिका प्रशासनानेही याबाबत पत्र पाठवले आहे. सागरी किनारा मार्गावर दीड – दोन महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात कंत्राटदाराचा एक कर्मचारीही मृत्युमुखी पडला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या गाडीमुळे हा अपघात झाला होता. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाबरोबरच पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal administration now enlist traffic police to stop car racing on coast road mumbai print news sud 02