मुंबई : रस्ते काँक्रिटीकरणासाठी मागविण्यात आलेले मिश्रण रस्ते कामांसाठी योग्य नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने संबंधित माल नाकारत मालवाहू मिक्सर वाहन माघारी पाठविले. रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळ आणि प्रत्यक्ष कार्यस्थळावरील मालात तफावत असल्याने कार्यस्थळी उपस्थित आयआयटीच्या तज्ज्ञांचे मत घेऊन कॉंक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण नाकारण्यात आले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून (क्यू. एम. ए.) खुलासा मागवण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. त्या अंतर्गत मानखुर्द – आगरवाडी गाव येथील कै. नितू मांडके मार्ग आणि चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्गावरील काँक्रिटीकरण कामाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी रात्री केली. काँक्रीटच्या कार्यवहन क्षमतेसाठी ‘स्लम टेस्ट’ करण्यात येते. त्याचा उपयोग काँक्रीटमध्ये सिमेंट व पाण्याचे प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो.
रस्ते बांधणी कामात ‘स्लम टेस्ट’ ला विशेष महत्त्व असल्यामुळे काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी महानगरपालिकेने आरएमसी प्लांट आणि प्रत्यक्ष कार्यस्थळ या दोन्ही ठिकाणी ‘स्लम टेस्ट’ बंधनकारक केली आहे. त्यानुसार रस्ते पाहणी दौ-याच्यावेळी मानखुर्द – आगरवाडी गाव येथील कै. नितू मांडके मार्ग कॉंक्रिटीकरण कार्यस्थळी स्लम टेस्ट करण्यात आली. त्या चाचणीचा अपेक्षेप्रमाणे परिणाम न दिसल्याने कॉंक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण नाकारून ‘आरएमसी’ वाहन माघारी पाठविण्यात आले. तसेच, नवीन मिश्रण मागवून काँक्रिटीकरण सुरु करण्यात आले. याप्रकरणी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आय. आय. टी. मुंबई) प्राध्यापकांचा सल्ला घेण्यात आला. आरएमसी प्लांट ते प्रत्यक्ष कार्यस्थळ या दरम्यान मिक्सर वाहन येईपर्यंत ३० ते ९० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. या वाहतूक कालावधीचा विचार करता कंत्राटदारांनी ३ काँक्रीटमिक्स डिझाईन बनवून घ्याव्यात. आरएमसी प्लांटवरून वाहन निघून ते कार्यस्थळी पोहोचण्याचा कालावधी ‘गुगल’ वर तपासून घ्यावा. तसेच, प्रत्यक्ष कार्यस्थळावर येईपर्यंत काँक्रीटची गुणवत्ता राखली जावी, यासाठी कोणते काँक्रीटमिक्स डिझाईन वापरावे, याची निश्चिती करावी. याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी करावे, अशा सूचना बांगर यांनी अधिका-यांना दिल्या.
अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी प्रकल्पस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य
महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दुय्यम अभियंता व सहाय्यक अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी प्रकल्पस्थळी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. रस्ते विकास कामाबाबत यशवंतनगर-चेंबूर येथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेथेही बांगर यांनी पाहणी केली. मलनिःसारण प्रकल्प विभागाअंतर्गत रस्ते कामापूर्वी भूमिगत नलिका टाकण्यात येणार आहे. त्याचे खोदकाम सुरु असून रस्ते विभाग आणि मलनिःसारण प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे मार्गी लावावित, असेही बांगर सांगितले.
रस्ते बांधणीसाठी ‘प्री कास्ट’ पद्धती शक्य ?
विक्रोळी येथील ‘गोदरेज’ आवारात ‘प्री कास्ट’ पद्धतीद्वारे काँक्रिट रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. या रस्त्याची देखील बांगर यांनी पाहणी केली. प्रायोगिक तत्त्वावर ‘प्री कास्ट’ पद्धतीचा अवलंब करून महानगरपालिकेला रस्ता बांधणी करणे शक्य आहे का, याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांसमवेत चर्चा करून कार्यपद्धती निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक पी. वेदगिरी, सहायक प्राध्यापक सोलोमन डिब्बार्ती, महानगरपालिकेचे उपायुक्त शशांक भोरे, रस्ते व वाहतूक विभागाचे उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.