मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली स्वच्छता मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. शनिवारी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेली स्वच्छता मोहिमेत गगराणी प्रथमच सहभागी झाले. गेल्या २३ आठवड्यांपासून मुंबई महानगरात सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे.
मार्च महिन्यात पालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे स्वच्छता मोहीम काहीशी थंडावली होती. मात्र शनिवारी आयोजित स्वच्छता मोहिमेत गगराणी सहभागी झाले होते. ही मोहीम अशीच पुढे सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) शनिवारी लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गगराणी यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासून स्वच्छतेच्या सर्व कार्यवाहीची पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह पालिकेचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा…अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा
कुलाबा परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मुंबादेवी मंदिर परिसरात अग्यारी गल्ली, वांद्रे पश्चिममध्ये लिलावती रुग्णालय परिसर, सांताक्रूझ पूर्व भागात प्रभात कॉलनी, कुर्ला परिसरात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन इत्यादी ठिकाणी गगराणी यांनी स्वच्छता मोहिमेतील कामांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करून त्यांनी आवश्यक निर्देश दिले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, सखोल स्वच्छता मोहिमेचे सातत्य टिकवण्यात येईल. महानगरपालिकेने कितीही व्यापक स्वच्छता केली तरी लोकसहभाग असेल तरच या मोहिमेला खरे यश मिळू शकेल. आगामी काळात स्वच्छतेसाठी अधिक प्रभावीपणे कार्यवाही केली जाईल, त्यादृष्टिने मनुष्यबळ, संसाधने, धोरण सुधारणा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
हेही वाचा…महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
पाण्याची चिंता नाही – आयुक्तांची ग्वाही
मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे पाणी टंचाईबाबत विचारणा केली असता आयुक्तांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला होता. तो कमी वेळेत जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पाणी साठा कमी झाला. भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी मुंबईकरांना साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.