मुंबई : मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नालानिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करा, आपापल्या कार्यक्षेत्रातील नाल्यांवर दररोज भेट देवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्या, पावसाळ्यात विविध प्राधिकरणांशी सतत संपर्कात राहा, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या. येत्या ५० दिवसांत म्हणजेच ३१ मे २०२५ पूर्वी नाले स्वच्छतेची कामे कशी पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असेही गगराणी यांनी सांगितले.
मुंबईतील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. त्यावेळी गगराणी बोलत होते.
या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
आपल्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला असायलाच हवी. त्या कामाची सद्यस्थिती, त्या ठिकाणची आव्हाने, पावसाळ्यात उद््भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर तोडगा काढा. कार्यालयीन कामे सांभाळून प्रत्येक अभियंत्याने प्रत्यक्ष नालेसफाई सुरू असलेल्या ठिकाणी दररोज भेट द्यायला हवी. आपल्याकडील कामांचे आणि उर्वरित दिवसांचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार वेळापत्रक तयार करा, अशा महत्त्वाच्या सूचना गगराणी यांनी केल्या.
मोठ्या नाल्यांमधून गाळ काढताना कामाचे आणि अंतराचे टप्पे ठरवून नियोजन करा. ज्या नाल्यांमध्ये तरंगणारा घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने साचतो, अशा नाल्यांची १५ मे २०२५ नंतर पुन्हा पुन्हा स्वच्छता करा. तसेच कोणत्या नाल्यांमध्ये कोणत्या ठिकाणी आणि कशामुळे कचरा साचतो याचे निरीक्षण करून त्यानुसार उपाययोजना करा, असेही निर्देशही आयुक्तांनी दिले.