वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री झालेल्या बैठकी दिलेल्या आश्वासनानंतर ‘मार्ड’ने आपला संप मागे घेतला. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची बुधवारी दुपारी भेट घेण्याच्या सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार महापालिका मार्डचे प्रतिनिधी दुपारी आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. मात्र एका मिनिटापेक्षा कमी वेळेतच ‘मार्ड’चे प्रतिनिधी आयुक्तांच्या कार्यालयातून बाहेर आले. आपल्या विविध मागण्यांसाठी मार्डने दोन दिवस संप पुकारला होता.
हेही वाचा >>> म्हाडा सोडतीच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात
या संपाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री मार्डच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचवेळी मुंबई महापालिकेअंतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांच्या मागण्या सोडविण्याबाबतचा निर्णय इक्बाल सिंह चहल घेऊ शकतात, असे सांगत मार्डच्या प्रतिनिधींना बुधवारी दुपारी पालिका आयुक्तांना भेटण्यास सांगितले. तसेच यासंदर्भात महाजन यांनी इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना तशा सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान मार्डचे प्रतिनिधी इक्बाल सिंह चहल यांना भेटण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयात गेले होते.
मार्डच्या प्रतिनिधींनी कार्यालयात चिठ्ठी पाठविल्यानंतर काही वेळातच त्यांना आतमध्ये बोलविण्यात आले. मात्र अवघ्या काही क्षणातच मार्डचे प्रतिनिधी चहल यांच्या कार्यालयातून बाहेर आले. जेमतेम एक मिनिटभरगी चहल त्यांच्याशी बोलले नाहीत. यावेळी चहल यांनी मार्डच्या प्रतिनिधींना त्यांच्या मागण्यांबाबत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांची भेट घेण्यास सांगितले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार हे कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मार्डच्या प्रतिनिधींना निराश होऊनच माघारी परतावे लागले.
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या देवेन भारतींवर मोठी जबाबदारी! मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती
आम्ही पुन्हा भेटीसाठी प्रयत्न करू मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे पाठविल्यामुळे मार्डचे प्रतिनिधी काहीसे नाराज झाले आहेत. त्यातच संजीव कुमार यांचीही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आता गुरूवारी पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची पुन्हा भेट घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.