मुंबई : उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. येत्या २ मे पासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार असून त्यासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्याची लिंक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यान्वित केली जाईल. तसेच, प्रशिक्षणाचे दुसरे सत्र २३ मे पासून सुरु होईल.
जलतरण हा क्रीडा प्रकार असण्यासोबतच एक उत्तम व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे १० तरण तलाव कार्यान्वित आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने इच्छुकांना या क्रीडा प्रकारापासून लांब राहावे लागते. पोहण्याची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात महानगरपालिकेने प्रशिक्षण वर्गांची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे प्रशिक्षणवर्ग महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आले आहेत. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी ठेवण्यात आली असून पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये दिले जाणार आहे.
या विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीने २४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी; पाच जणांवर गुन्हा
प्रशिक्षणासाठीच्या जलतरण तलावांची यादी
- महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम)
- जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व)
- सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम)
- बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम)
- बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,मालाड (पश्चिम)
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम)
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व)
- बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी
- बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
- बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा