मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘शून्य औषध चिठ्ठी योजना’ (झिरो प्रिस्क्रिप्शन) राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे रुग्णांना कोणतेही औषध बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही. यासाठी लागणाऱ्या वाढीव औषध खरेदीचा आढावा घेऊन एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहेल यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागू नये यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन योजना राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) यांनी संबंधित अधिष्ठाते व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रमुख रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या औषध खरेदीचा आढावा घेतला. तसेच रुग्णांना बाहेरून कोणती औषधे आणावी लागतात याची माहिती घेतली. पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांसाठी वर्षाकाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची औषध खरेदी केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निविदा प्रक्रिया व पुरवठादारांकडून होणारा पुरवठा तसेच अन्य काही कारणांमुळे अनेकदा उपचार करणारे डॉक्टर रुग्णांच्या नातेवईकांना बाहेरून औषध आणण्यास सांगतात. यापुढे रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयाच्या बाहेरून औषध खरेदी करावी लागू नये यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी एक हजार कोटींच्या जादा औषध खरेदीचा प्रस्ताव तयार करून आयुक्त इक्बालसिंह चहेल यांच्याकडे गेल्या आठवड्यात सादर केला. आयुक्तांनी त्याला मान्यता दिली असून लवकरच एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त औषध खरेदी केली जाईल, असे पालिका सूत्रांंनी सांगितले. या योजनेची अंमलबजावणी येत्या १५ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

हेही वाचा : शिवडी-न्हावाशेवा लिंक रोडवरील प्रवासासाठी भरावा लागणार २५० रुपयांचा टोल, मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब!

महापालिकेच्या सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात एकूण ७१०० रुग्ण खाटा असून वर्षाकाठी बाह्य रुग्ण विभागात ६८ लाख २१ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. याचाच अर्थ दररोज सरासरी या सर्व महाविद्यालयात २१,३०० रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जातात. याशिवाय काही लाख रुग्णांवर दाखल करून उपचार केले जातात तर जवळपास अडीचा लाख शस्त्रक्रिया वर्षाकाठी होतात. या तसेच पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांसाठी वर्षाकाठी ६०० कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात येत होती. शून्य औषध चिठ्ठी योजना राबवायची असल्यामुळे आता ही औषध खरेदी १६०० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना प्रमुख रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने ती पालिकेच्या सर्व रुग्णालयात राबविले जाईल असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबईत घरांच्या किमतीत सात टक्के वाढ, ११ वर्षांतील सर्वाधिक घरविक्री मावळत्या वर्षात

“महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये शून्य चिठ्ठी औषध योजना राबविण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणावी लागणार नाहीत. मुंबई महापालिकेची रुग्णालये ही रुग्णस्नेही व सक्षम बनविण्याचे काम सुरु आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारापासून रुग्णालयीन स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून जवळपास प्रत्येक रुग्णालयात जाऊन मी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आता पालिका रुग्णालयात रात्रीच्या रुग्ण चाचण्या होऊ लागल्यामुळे रुग्णांना आता बाहेरील खाजगी लॅबमध्ये जावे लागत नाही. तसेच यापुढे सर्व रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातूनच औषधे देण्यात येतील.” – अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. सुधाकर शिंदे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation 1000 crores for zero prescription scheme at municipal hospitals mumbai print news css
Show comments