मुंबई : लाकूड किंवा कोळसा जाळून त्यावर चालणाऱ्या बेकरी व उपाहारगृहातील तंदूर भट्ट्या आता लवकरच बंद कराव्या लागणार आहेत. पाव, लादीपाव यासारख्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल, उपाहारगृहे, उघड्यावर अन्न पदार्थ तंदूर करणारे व्यावसायिक यांना पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेने या सर्व व्यावसायिकांना आता ८ जुलैची मुदत दिली आहे. अन्यथा, कठोर कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

वायुप्रदूषणासाठी बांधकामे आणि प्रकल्पांमधून निर्माण होणारी धूळ व तत्सम घटक कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे, लाकूड व कोळसा याचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल, उपाहारगृहे आणि उघड्यावर खाद्यापदार्थ विकणारे व्यवसायदेखील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात. यासंदर्भात उच्च न्यायालयाने ९ जानेवारी रोजी घेतलेल्या सुनावणीत सहा महिन्यांच्या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारित व्यावसायिकांनी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने या सर्व व्यावसायिकांना ८ जुलै २०२५ ची मुदत दिली आहे. तसेच, हरित व स्वच्छ इंधनाचा अवलंब न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेला दिले. लाकूड व कोळसा याचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल, उपाहारगृहे व उघड्यावर खाद्यापदार्थ विकणारे व्यवसाय प्रदूषणास कारणीभूत ठरतात.

२९ भट्ट्यांतील वापर बंद

न्यायालयाचे आदेश येण्यापूर्वीच मुंबईत मागील तीन महिन्यांत २९ बेकरींनी स्वत:हून लाकूड/ कोळशाचा वापर बंद केला असून हरित इंधनाचा त्यांनी स्वीकार केला आहे. मुंबईतील बेकरी, हॉटेल्स्, उपाहारगृहे, उघड्यावर अन्नपदार्थ तयार करून विक्री, तंदूर या व तत्सम स्वरूपाच्या सर्व व्यावसायिकांनी यापुढे इंधन म्हणून लाकूड व कोळसा यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. त्याऐवजी पर्यायी स्वरूपात उपलब्ध असलेल्या स्वच्छ व हरित इंधनाचा (सीएनजी, पीएनजी इत्यादी) वापर सुरू करावा. या आदेशांचे ८ जुलैपर्यंत पालन केले गेले नाही, तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

Story img Loader