मुंबई : वेसावे येथील किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम महानगरपालिका प्रशासनाने तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी या भागातील दोन इमारती जमीनदोस्त केल्या. तसेच, येत्या काळात आणखी सात ते आठ इमारतींवर तोडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
वेसावे भागात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या भागात आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात येत आहे. वेसावे गाव (शिवगल्ली) भागातील अनधिकृत बांधकामांविरोधातील ३ जूनपासून कठोर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत या भागातील सात इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळमजला आणि तीन मजली, चार मजली तसेच पाच मजली इमारतींचा समावेश आहे.
हेही वाचा – मुंबई : शाळेच्या गाडीने धडक दिलेल्या मुलीचा अखेर मृत्यू
वेसावे भागात बुधवारी महानगरपालिकेचे ३९ अधिकारी, ३० कामगारांनी एक पोकलेन संयंत्र, दोन जेसीबी, पाच हँडब्रेकर आदी संसाधनांच्या साहाय्याने ही कारवाई केली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या भागातील आणखी सात ते आठ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.